लोकसत्ता टीम
चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करावे, अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते व माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उधळली.स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत ते होते.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला येणे हा फडणवीस यांचा मनाचा मोठेपणा आहे. फडणवीस यांनी मोदींचे वारसदार व्हावे, दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी माझे अनुमोदन आहे. राजकारणात ज्युनिअर कडून सिनिअरने शिकण्यासारखे आहे. मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे म्हणून मा.सा.कन्नमवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला होता.
आणखी वाचा-आसमच्या खाण दुर्घटनेत नागपूरच्या ‘वेकोलि’कडून मदत
राज्यात पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मान कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांना मिळाला होता. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलाला मंजुरी देण्याचे काम कन्नमवार यांनी केले होते. फडणवीस यांनी राजकीय बारकावे मुल, मारोडा येथे घेतले. चंद्रपूर जिल्ह्याला आता कोणीच वाली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला दत्तक घेतले पाहिजे. फडणवीस देशाचे नेतृत्व करणार आहेत. तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील एका “वारा” व्यक्तीला सोबत ठेवावे असेही वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचे नाव द्यावे, असेही वडेट्टीवार म्हणाले.