राज्यात आज एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत असताना दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांच्या घोषणाबाजीने झाली. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सराकारने उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी. स्थगिती सरकार हाय हाय. ५० खोके एकदम ओके”, अशा घोषणा विरोधकांकडून यावेळी देण्यात आल्या.
“तुम्ही सात वेळा निवडून आलात, आम्ही…”
दरम्यान, अजित पवारांनी स्थगितीच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं. “तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
“आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही”
“तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे तरतुदी जास्त आहेत, तिथल्या स्थगित्या कायम ठेवल्या आहेत. लवकरच त्यासंदर्भातही योग्य निर्णय आम्ही घेऊ. आवश्यक असेल, तिथे सत्तारुढ पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गरज असेल, तर मी तुम्हालाही त्याची माहिती पाठवतो. कुणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
“हे पैसे आणायचे कुठून?”
“माझ्या स्वत:च्या मतदारसंघातली कामं तुम्ही रोखली होती. अडीच वर्षं भाजपाच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही. ज्या काही स्थगित्या आणल्या होत्या, त्यातल्या ७० टक्के स्थगित्या आम्ही उठवल्या आहेत. ३० टक्के स्थगित्या यासाठी कायम ठेवल्या आहेत, की शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे २ हजार कोटींची तरतूद आहे. तिथे ६ – ६ हजार कोटी रुपये वाटले आहेत. त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. हे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या अशी अवस्था असेल, तर तशा प्रकारे हा निधी मंजूर होईल”, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या काळातील निर्णयांवर आगपाखड केली.