नागपूर: उपराजधानीमधील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब परिसरात असलेले पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचे रविवार ९ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

 योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजली फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यावेळी उपस्थित होते.  या प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पतंजली उद्योग समूहाकडून महाराष्ट्रात १० हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१६ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाला विलंब का झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, रामदेव बाबांनी मी मुख्यमंत्री झाल्याशिवाय या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे नाही, असे ठरवल्यामुळे विलंब झाला असे सांगितले. यावेळी कार्यक्रमस्थळी एकच हसा पिकला. रामदेव बाबांनी सांगितले की, तुम्ही आता मुख्यमंत्री झालात, आता उद्घाटनाला नक्की या आणि मी आलो असेही फडणवीस म्हणाले.

पतंजली फूड पार्कमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आशिया खंडात पहिल्यांदा फळ प्रक्रिया उद्योगात वापरले जात आहे. त्यामुळे आमचे उत्पादन जगात कुठल्याही देशात निर्यात करता येईल, अशा दर्जाचे राहणार आहे. आतापर्यंत आम्ही एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. ती भविष्यात वाढत जाणार आहे. या प्रकल्पात आमच्याकडे सेझच्या बाहेर २२५ एकर जमीन तर सेजमध्ये १०० एकर जमीन आहे. सध्या ५०० पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत. संत्र्याशिवाय या ठिकाणी आवळा, एलोवेरा, पेरू आणि इतर फळांचा रस तयार केला जाणार आहे. 

रामदेव बाबांना सर्वात महाग जमीन दिली: मुख्यमंत्री

रामदेव बाबांना हा प्रकल्प उभारण्यासाठी अनेक राज्यांनी आग्रह धरला होता. परंतु, त्यांनी विदर्भ आणि नागपूरला आपली पसंती दर्शवली. यासाठी त्यांना जमीन मोफत किंवा कमी दराने देण्यात आलेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. निविदा प्रक्रिया राबवून सर्वात जास्त दर टाकणाऱ्या ही जागा देण्यात आली. सुदैवाने तीन्ही वेळा पतंजलीनेच निविदा भरल्यामुळे त्यांनाच जागा मिळाली असेही फडणवीस म्हणाले. पतंजली फूड पार्कमधून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असा अशावाद मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader