गेल्या काही वर्षांत महिलांविरोधातील गुन्हे आणि महिला अपहरणांचं प्रमाण वाढल्याचं अहवालातून समोर येत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरलं. त्यातच, NCRB ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातही महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं. यावरून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन जारी केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्हे वाढले नसल्याचं सांगितलं. तसंच, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित असल्याचंही सांगितलं.
नेमकी वस्तुस्थिती काय?
“हरवलेल्या मुली, स्त्रिया, अपहरण झालेल्या स्त्रिया यांचा विषय सातत्याने येतोय. गेल्या दोन आठवड्यांत असं मांडलं जातंय की हे सरकार आल्यापासून नुसतं अपहरणच चालू आहे. पण वस्तुस्थिती अशी नाही. सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे कोणतीही मुलगी घरातून निघून गेली की आपल्याला अपहरण या सदराखाली नोंद घ्यावी लागते. पण त्यांच्या परत येण्याचं प्रमाणही तेवढंच आहे. महाराष्ट्रात सरासरी दरवर्षी चार हजार मुली आणि ६४ हजार महिला बेपत्ता होतात. मविआच्या काळात २०२० मध्ये ४५१७ मुली, आणि ६३ हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा >> “मी जर बोललो तर मग बेक्कार होईल”, विधानसभेत महाजन-वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी; म्हणाले…
सर्वाधिक गुन्हेगारीच्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश नाही
“पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली या सर्व राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याची स्थिती या बाबतीत बरी आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे असं NCRB च्या आकडेवारीतून सांगितलं जातं. या अहवालात दोन गोष्टी असतात. एकूण घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि क्रमवारी. त्याचवेळी प्रतिलाख लोकांमागे किती गुन्हे घडले आहेत याचीही माहिती असते. कारण गोव्याची तुलना महाराष्ट्राशी करता येणार नाही. म्हणून प्रति लाखामागे किती गुन्हे घडले हेही पाहणं महत्त्वाचं आहे. गुन्ह्यांसदर्भात २०२०चा विचार केला तर ३ लाख ९४ हजार १७ एवढे गुन्हे होते. २०२० च्या तुलनेत यातील २० गुन्हे कमी झाले होते. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश या पाच राज्यात सर्वाधिक गुन्हेगारी आहे. यात महाराष्ट्र येत नाही”, अस फडणवीस म्हणाले.
“गुन्ह्यांसंदर्भातील सांख्यिकीला माझा विरोध होता. आज दिल्ली आणि मुंबईची तुलना केली तर दिल्लीमध्ये १२ वाजता एखाद्या मुलीला सुरक्षित वाटेल का? तसंच मुंबईत वाटतंय का? मुंबईत आज १२ वाजता मुली सुरक्षित फिरू शकतात. याला सांख्यिकीच्या आधारावर बदनाम केलं जातं तेव्हा विश्लेषण करावं लागतं”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> मंत्री लोढांनी दर्शवली राजीनाम्याची तयारी, परिषदेत काय घडले?
बलात्कार प्रकरणांत महाराष्ट्र सोळाव्या क्रमाकांवर
“महिलांवरील हल्ल्यांसदर्भात राजस्थान आपल्यापेक्षा वर आहे. आपण त्याच्या खाली आहोत. लोकसंख्येच्या आधारावर क्राईम रेट पाहिला तर उडीसा, राजस्थान, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र अशी क्रमवारी आहे. या सगळ्या राज्यांच्या तुलनेत याही संदर्भात महाराष्ट्र पाठीमागे आहे. एकही बलात्कार झाला तरी तो आपल्यासाठी भुषणावह नाही. मी समर्थक नाही. पण बलात्कार होतात ही वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही. त्याविरोधात कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत, याला दुमत असू शकत नाही. पण असं रंगवलं जातं की महाराष्ट्रात खूप बलात्कार होतात. आज बलात्कारात महाराष्ट्र सोळाव्या क्रमांकावर आहे”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. तसंच, महाराष्ट्र अत्यंत सुरक्षित राष्ट्र आहे, असंही ते पुढे म्हणाले.
बेपत्ता मुलींचा शोध सुरू
महिलांवरचे गुन्हे, खून, घरफोड्या, बलात्काराच्या घटना यांमध्येही घट झाली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतं जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम केलं जातं आहे. मी आपल्याला आणि आपल्या मार्फत माध्यमांना विनंती करतो की वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला बदनाम करणं थांबवावं. नागपूर पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ४४३ आरोपींना अटक केली आहे. नागपूर गुन्हे शाखेने नार्को पोलीस युनिटही तयार केलं आहे. मुली बेपत्ता झाल्या ही बातमीही नागपूरच्या बाबतीत आली. माहे ऑक्टोबरपर्यंत ३३८ मुली बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं. त्यातल्या ३२६ परत आल्या आहेत उर्वरित बारा मुलींचाही शोध नागपूर पोलीस घेत आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.