गडचिरोली : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागाचा आजही संपर्क तुटतो. यामुळे त्या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, ही समस्या प्राथमिकतेने सोडविण्यासाठी त्या भागात पूल आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करून त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील बुर्गी, सुरजागडसारख्या नक्षलग्रस्त भागांत भेट देऊन विकास कामांचे लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – Buldhana Accident: ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हा दाखल का नाही? संतप्त कुटुंबीयांचा आक्रोश
गडचिरोलीच्या इतिहासात कोठी कोरनार या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. कोठी कोरणार येथे वीर बाबुराव शेडमाके पुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे छत्तीसगड राज्य तसेच १७ गावांना जोडण्यात येत आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणारी गावे पूल आणि बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉयड मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आदी उपस्थित होते.
हेही वाचा – भंगार विक्रीतून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल; ९.३७ कोटींची कमाई
पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथील आदिवासी संस्कृती आणि परंपरा पर्यावरण पूरक आहेत. त्याचे जतन करूनच जिल्ह्याचा विकास करण्यात येईल. पर्यावरणपूरक खनिजामुळे गडचिरोलीत समृद्धी येईल. पर्यावरणाचे रक्षण करून व स्थानिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रभाकरण यांनी लॉयड मेटलची सुरुवात केली आहे. कोनसरीला लॉयड मेटलला नवीन जागा देण्यात आली असून त्याचे भूमिपूजनसुद्धा करण्यात आले आहे. गडचिरोलीत २० हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खनिज वाहतूक आराखड्याला मान्यता देण्यात येईल. वाहतुकीसाठी खाणपट्टा (मायनिंग कॉरिडॉर) जिल्ह्यात उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे. सुरजागड येथून निघणारे खनिज यावर पहिला हक्क गडचिरोलीचा असून उद्योग उभारणी संदर्भात सर्वात पहिले जिल्ह्याचा व नंतर विदर्भाचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शौर्य पदक प्राप्त पोलिसांचा सत्कार
अहेरी येथे जिल्हा पोलीस संकुलात कॅन्टीन, वाचनालय, उद्यान, आदींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्गम भागातील मोबाईल टॉवरचे उद्घाटनदेखील करण्यात आले. पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस जवानांचा त्यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, यावर्षी गडचिरोलीतील एकूण ६३ जणांना पदक प्राप्त झाले. यातील ३३ जवानांना शौर्य पुरस्कार प्राप्त झाल्याने गडचिरोली पोलिसांची मान उंचावली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकशाहीच्या रक्षणाकरिता दुर्गम, डोंगराळ भागात पोलीस जवान आपले कर्तव्य पार पाडत असतात. हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे.