नागपूर : रोज माध्यमांपुढे येणारी, आरोप करणारी, किंवा विरोधकांच्या आरोपांना चोख प्रतिउत्तर देणारी, आपली बाजू ठामपणे माध्यमांपुढे मांडणारी, एक प्रकारे माध्यमांचा अचूक वापर कसा करायचा यात तज्ज्ञ असणारी व्यक्ती म्हणजे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मात्र त्यांनी आज (सोमवारी) “मी आज कोणाविरुद्धही बोलणार नाही”, असे सांगून माध्यमांनाच बुचकळ्यात पाडले.
सोमवारी नियोजित कार्यक्रमानुसार फडणवीस कोराडी (जिल्हा नागपूर) येथील प्रसिद्ध देवी मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला गेले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याने या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रम आटोपून जात असताना फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अयोध्येतील राम जन्मभूमी आंदोलनाशी सुरुवातीपासून जुळलो होतो. कारसेवा केली. आता अयोध्येत राममंदिर होत आहे याचा आनंद आहे, याचा साक्षीदार होता आले हा रामाचा आशीर्वाद आहे असे मला वाटते.
हेही वाचा – नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा विवाहितेवर बलात्कार
अयोध्येतील कार्यक्रम आणि तत्सम बाबींवर विरोधकांनी केलेल्या टीकेकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आजचा दिवस चांगला आहे, अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, त्यामुळे मी कोणाविरुद्धही काही बोलणार नाही.