नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी युती करणार नाही असे वक्तव्य केले होते. मात्र राष्ट्रवादीचा एक गट आता त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नसल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. अनिल देशमुख प्रसार माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याचे काय झाले. याबाबत त्यांना कोणी प्रश्न विचारले नाही. त्या वक्तव्याचे मग काय झालं असाही प्रश्न पडतो. ठीक आहे परिस्थिती बदलताना वेगवेगळे वक्तव्य केले जातात मात्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असेही देशमुख म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जे बाहेर पडले आहे आणि त्यांना पश्चाताप झाला तर ते परत येऊ शकतात असेही देशमुख म्हणाले. मंत्रिमंडळाची यादी दिल्लीतून निघाली मुंबईत पोहचणार अशा चर्चा कानावर पडत आहे. पण जोपर्यंत खाते वाटप जाहीर होत नाही तोपर्यंत काही बोलणे योग्य नाही. कोणाला कोणतं खाते द्यायचे हा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे.
मात्र अधिवेशनापूर्वी खाते वाटप झाले तर आम्हाला सभागृहात संबंधीत विषयावर चर्चा करता येईल. ओबीसी आरक्षणासाठी संदर्भात राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे मांडला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला पाहिजे असेही देशमुख म्हणाले. सध्याची जी काही परिस्थिती राज्यात आहे आणि पुन्हा काही दिवस तशीच राहिली तर सगळ्याच विरोधी पक्षांना एकत्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी लागेल. राज्यात एका मंत्राकडे सहा सहा जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा कारभार आहे. ते न्याय देऊ शकत नाही. अजून मंत्री पदी काही जागा रिकाम्या आहे. त्यावर निर्णय होत नाही. खाते वाटपाचा निर्णय होत नाही. दीड वर्षापासून जनता राजकीय पक्ष फोडाफोडीचा राजकारण पाहून वैतागली असल्याचे देशमुख म्हणाले.