तान्हा पोळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या काळी व पिवळी मारबतीसह विविध राजकीय आणि सामाजिक विषयावर मिरवणूक काढण्यात आल्यानंतर या मारबत आणि बडग्याचे काय करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. मिरवणूक झाल्यानंतर ते आपापल्या भागात परत गेल्यावर परिसरातील मोकळ्या मैदानात नेतात आणि तिथे मंडळाच्या प्रमुख व्यक्तीच्या हस्ते त्याचे दहन केले जाते.
हेही वाचा >>> ‘येथे’ भरतो बैलांऐवजी ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या…
ऐतिहासिक असलेली २० ते २२ फूट उंच असलेली पिवळ्या मारबतीची मिरवणूक आटोपल्यावर तिला मध्य नागपुरातील लेंडी तलाव परिसरात नेले जाते. तिची विधिवत पूजा केल्यानंतर दहन केले जाते. ही पिवळी मारबत आठ दिवस आधी दर्शनासाठी ठेवली जाते त्यामुळे अनेक महिल खण नारळाची ओटी भरतात. त्यावेळी अनेक साडी अर्पण करतात. त्यामुळे या मंडळातर्फे गोरगरीब महिलांना या साड्याचे वाटप त्याच ठिकाणी केले जाते.
काळी मारबतची नेहरु पुतळा चौकात दहन केले जाते.
हेही वाचा >>> गोंदियात मुसळधार पाऊस; रस्ते बंद; मारबत-बडगे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण
शिवाय मासुरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकटनगर, मस्कासाथ, खैरीपुरा, जागनाथ बुधवारी, पिवळी नदी, चांभारपुरा या भागातून विविध बडग्या उत्सव मंडळाच्या वतीने राजकीय व सामाजिक विषयावर बडग्याची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर हे बडगे आपआपल्या भागात घेऊन जातात आणि त्याचे माशा मुरकुट्या आणि रोगराईला घेऊन जारे बडग्या अशा घोषणा देत त्याचे दहन केले जाते. त्यानंतर सायंकाळी आपआपल्या परिसरात तान्हा पोळा भरवतात. या संदर्भात छत्रपती बडग्या उत्सव मंडळाचे प्रमुख रामभाऊ अंबुलकर यांनी सांगितले, आम्ही यावेळी सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या स्टॅलिनचा बडग्या केला होता.दुपारी ४ वाजता मिरवणूक आटोपल्यावर आम्ही मस्कासाथ येथील मोकळ्या मैदानात या बडग्याचे दहन केले.