बुलढाणा : तब्बल तीन शतकांची परंपरा व पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान असलेल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर( जिल्हा जळगाव ) संत मुक्ताईच्या पालखीचे आज दुपारी बुलढाणा नगरीत आगमन झाले. त्यापूर्वी रणरणत्या उन्हात पंढरपूरकडे निघालेली ही पालखी रणरणत्या उन्हात मलकापूर मार्गावरील घाट चढून बुलडाण्यात मुक्कामी डेरेदाखल झाली.
पालखीचे यंदा ३१४ वे वर्ष असून २ जूनला श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून पालखीने कूच केली. मलकापूर येथे काल विसावा घेणाऱ्या या वारीने आज मोताळा मार्गे बुलढाण्याकडे प्रयाण केले. डोक्यावर प्रखर तेजाने तळपणारा सूर्य अन ४२ अंशांच्या आसपास रेंगाळणाऱ्या तापमानाची तमा न बाळगता शेकडो वारकऱ्यांनी राजूर घाट चढण्यास प्रारंभ केला. घाट माथ्यावर पोहोचल्यावर माऊलीचा जयजयकार करत निघालेली पालखी बुलढाण्यात दाखल झाली.
३३ दिवसांत ६०० किलोमीटर
दरम्यान पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे यांनी आषाढि वारीचे यंदा ३१४ वे वर्ष असल्याचे सांगितले. ३३ दिवसांत ६०० किमी अंतर कापून पालखी पंढरपूर ला दाखल होणार आहे. पालखीला पंढरपूर मध्ये प्रथम प्रवेशाचा मान असल्याचे हरणे यांनी सांगितले. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे .संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करते असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
वाखरी येथे होते भावंडांची भेट
तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो.