लोकसत्ता टीम
बुलढाणा : तालुक्यातील देवपूर गावात पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने संतप्त सरपंच पती व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील ५५ फुट उंच टाकीवर चढल्याने गाव परिसरासह प्रशासनात एकच खळबळ उडाली. गावात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन झाल्यावर शुक्रवारी सायंकाळी हे ‘जलकुंभ चढो’ आंदोलन मागे घेण्यात आले.
शुक्रवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की गावात मागील दोन वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. हे काम मंदगतीने होत असल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. योजना पूर्ण न झाल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वारंवार प्रशासन आणि शासनाला कळवून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आणखी वाचा-गृहमंत्री पांघरून घालतात म्हणून गुन्हेगारी घटनांत वाढ, वडेट्टीवार यांचा आरोप
यामुळे सरपंच पती, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी गावातील ५५ फुट पाण्याच्या टाकीवर चढून आज आंदोलन सुरु केले. गावातील पाणी पुरवठा योजना तत्काळ पुर्णत्वास नेण्यात यावी व गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी यावेळी गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता परळकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देवून गावकऱ्यांशी चर्चा केली. सदर योजना लवकरात लवकर पुर्णत्वास नेण्याचे लिखित आश्वासन दिल्यावर संध्याकाळी आंदोलनकर्ते खाली उतरले. आंदोलनात आस्तिक वारे, यांच्यासह सुनिल नरोटे, रघुनाथ नरोटे, हरिष कांबळे, गणेश कुन्हर, किरण दुतोंडे, दशरथ नरोटे, भगवान धनवटे आदी सहभागी झाले.
आणखी वाचा-मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
१५ जानेवारीचे अल्टीमेटम
यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता परळकर यांनी गावकऱ्यांना लिखित आश्वासनात १५ जानेवारी पर्यंतचा अवधी मागीतला आहे. दरम्यान या आंदोलनाची माहिती कंत्राटदार राहुल वारे यांना मिळताच त्यांनी देखील गावात भेट देवून चर्चा केली व सदर योजनेचे काम १५ जानेवारी पर्यत पुर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे जर या योजनेचे काम १५ पर्यत पुर्ण झाले नाही तर गावकरी १५ जानेवारी नंतर याच पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारतील असा इशाराही आस्तिक वारे यांनी दिला.