नागपूर : राज्यातील विविध महामार्गांवर ढाबाचालक ट्रॅव्हल्स कंपनींच्या चालक-वाहकांना नि:शुल्क जेवणासह इतरही प्रलोभने देतात. येथे अनेक बसचालक जेवणासोबत मद्य घेत असल्याचे सर्सासपणे दिसून येते. या मद्यपी चालकांवर प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान परिवहन खात्यावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा येथे ३० जूनच्या मध्यरात्री झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवालात या बसचालकाच्या रक्तात मद्याचे अंश आढळले. त्यामुळे हा चालक मद्य प्राशन करून वाहन चालवत असल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे मद्यपान करून ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – नागपूर : विघ्नहर्त्याच्या दर्शनाला जाता, मग स्वतः:ची काळजी घ्या! मंदिर व्यवस्थापनाने का केली ही सूचना?

परिवहन खात्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसचे मार्ग तपासल्यास त्या ठराविक ढाब्यावरच थांबताना दिसतात. येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी ग्राहक मिळवून देण्याच्या बदल्यात ढाबाचालक संबंधित बसच्या चालक-वाहकांना मोफत जेवणासोबत इतरही लाभ देतात. अनेक ठिकाणी चालकांना मद्यही उपलब्ध केले जाते. चालक जेवणासह मद्यप्राशन करून वाहनाचे स्टिअरिंग हाती घेतात. चालकाची मद्यप्राशन तपासणी जेवणापूर्वी कुणी केली असल्यास त्यात काहीही सापडत नाही. परंतु, जेवणानंतर केल्यास रक्तात मद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळणे शक्य आहे. परंतु, मनुष्यबळासह साधनांच्या अभावाने एवढ्या मोठ्या स्तरावर तपासणी मोहीम राबवण्याची सोय परिवहन खात्याकडे नाही. त्यामुळे शासन ट्रॅव्हल्स बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात ६९ हजारांवर बसेसची नोंद

परिवहन खात्याच्या माहितीनुसार राज्यात सध्या ६९ हजारांच्या जवळपास करार पद्धतीच्या प्रवासी बसेस आहेत. त्यापैकी ५० हजारच्या जवळपास बसेस रस्त्यांवर धावतात. या बसेस ट्रॅव्हल्स कंपनी अथवा इतर कंपनी वा व्यक्तींच्या नावावर आहेत. तर अनेक बसेस मालक ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत करार करून संबंधित ट्रॅव्हल्सच्या नावावर प्रवासी वाहतूक करतात.

हेही वाचा – विदर्भात सहा उद्योगांकडून ५९.४८ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

सध्या पन्नास हजारांवर करार पद्धतीच्या बसेस रस्त्यांवर धावतात. एकाच वेळी त्यातील चालकांची विविध ढाबे वा विशिष्ट ठिकाणी मद्य तपासणी अवघड आहे. परंतु, परिवहन खाते गांभीर्याने तांत्रिक वा इतर पद्धतीच्या मदतीने मद्य प्राशन करून वाहन चालवण्यावर प्रतिबंध घालण्यासाठीचे नियोजन करत आहे. – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.

सामूहिक प्रयत्न गरजेचे

महामार्गांवरील विशिष्ट ढाब्यांवर अनेक ट्रॅव्हल्सचे थांबे दिसतात. येथे व्यवसाय वाढवून दिल्याच्या मोबदल्यात बस चालकाला मोफत जेवणासह मद्याचीही सोय करून दिली जाते. हा प्रकार थांबवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरटीओ, पोलीस, महामार्ग पोलिसांचे समन्वय करून विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे. – प्रसाद महाजन, परिवहन क्षेत्राचे अभ्यासक व निवृत्त परिवहन सहआयुक्त.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhaba operators on various highways in maharashtra offer free meals to bus drivers of travel companies mnb 82 ssb