लोकसत्ता टीम
बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील धाड येथे शनिवारी रात्री उशिरा दोन भिन्न धर्मियांत संघर्ष पेटला. यावेळी झालेल्या वादावादी, धक्काबुक्कीचे पर्यवसान तुफानी दगडफेकीत झाले. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. सध्या धाड मध्ये तणावपूर्ण शांतता असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली धाड पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. रविवारी, १ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रकरणी उभय गटाच्या ३३संशयित आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच १७ जणांना अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले. दीर्घ काळ चाललेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी आणि संघर्षात सहभागी नागरिक जखमी झाले आहे.
आणखी वाचा-अकोला : विदेशी ‘पाहुण्यां’ची अद्याप प्रतीक्षाच, ‘झुडुपी’ची हजेरी…
जिल्ह्यातील धाड या गावात रात्री टिपू सुलतान जयंती मिरवणुकी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात वाद निर्माण झाला होता.याचे रूपांतर दगडफेक व जाळपोळीत झालं. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे . अनेक वाहनांची जाळपोळ ही करण्यात आली आहे .
पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. रस्त्यावर जाळपोळ केलेली वाहने पोलिसांच्या टीमने उचलून बाजूला करीत रस्ता मोकळा केला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी गावात ठाण मांडून आहेत. पोलीस दल, दंगा काबू पथक, जलदगती कृती दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.