अकोला : काँग्रेसने वंचितला ‘इंडिया’ व महाविकास आघाडीमध्ये सोबत न घेतल्यास केवळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगी लढती होतील, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी व्यक्त केले.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समावेशावरून जोरदार चर्चा रंगत आहे. सत्ताधारी भाजपा विचारधारेच्या विरोधातील सर्वपक्षांनी यामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. ‘इंडिया’मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. काँग्रेस आणि वंचितची लोकसभा निवडणुकीत आघाडी होणार का? यावरून अंदाज बांधले जात असतानाच ॲड. आंबेडकरांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. आता आघाडी झाली तरी काँग्रेसला अकोल्याची जागा ॲड. आंबेडकरांसाठी सोडावी लागेल. आघाडीच्या चर्चेपूर्वीच वंचितने पुढचे पाऊल टाकले. या संदर्भात ‘ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसची कोंडी; अकोल्यात पुन्हा तिरंगी लढतीचे संकेत’ असे वृत्त ‘लोकसत्ता सत्ताकारण’मधून प्रसारित करण्यात आले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.
हेही वाचा – वाशिम : …अन् ‘त्या’ चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, जिल्हाधिकारीही झाल्या भावूक!
यावर वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी काँग्रेसच्या गंभीरतेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’ व ‘मविआ’मध्ये बरोबर घेतले नाही तर फक्त अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगी लढत होऊ शकते. काँग्रेस जर भाजपा व संघाला हरविण्याबद्दल प्रामाणिक व गंभीर असेल तर ते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत सामावून घेतील, अशी अपेक्षा आहे.” याचे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत खात्यावरून ट्विटदेखील केले आहे. आता या प्रकरणी काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.