अमरावती : विधानसभेच्‍या निवडणूक प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून विरोधकांना कोंडीत पकडण्‍याचे प्रयत्‍न सुरू झाले आहे. प्रचार सभांमध्‍ये बोलताना उमेदवाराकडून वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये केली जातात. विरोधकांकडून तोच धागा पकडून चित्रफिती प्रसारीत केल्‍या जातात. अशीच एक चित्रफित आता समाज माध्‍यमांवर प्रसारीत झाली आहे. त्‍यात काँग्रेसचे माजी आमदार आणि धामणगाव रेल्‍वे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्याविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्‍यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना वीरेद्र जगताप यांनी प्रचाराला विकासाचे मुद्दे न राहिल्‍याने भाषणाच्‍या व्‍हीडिओमधील अर्थाचा अनर्थ करून विरोधक प्रचार करीत असल्‍याचे म्‍हटले आहे. विरोधकांची आधीच पराजय स्‍वीकारल्‍याचा दावा वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. सोबतच पूर्ण चित्रफित प्रसारीत केली आहे.

वीरेंद्र जगताप यांनी काल रात्री धामणगाव रेल्‍वे मतदारसंघातील एका प्रचार सभेत केलेले वक्‍तव्‍य वादात सापडले आहे. गरीब शेतकऱ्याकडे दोन, पाच एकर शेती असते. पण, त्‍यांच्‍या घरात कॅन्‍सर, लिव्‍हर, कीडनीचे आजार उद्भवतात. हे आजार का होतात, हे ठाऊक आहे का, लिव्‍हर का खराब होते, कारण ते नाईन्‍टी, सिक्‍स्‍टी काही तरी असते ना, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. दारूमुळे हे आजार होतात, असे त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यातून ध्‍वनित झाले आहे.

हे ही वाचा…. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

वीरेंद्र जगताप यांनी मात्र, आपल्‍या भाषणाची संपूर्ण चित्रफित समाज माध्‍यमावर प्रसारीत करून विरोधकांना उत्‍तर दिले आहे. कीडनी, लिव्‍हरचे आजार झाले, हृदयविकाराचा धक्‍का बसला, ओपन हार्ट सर्जरी करण्‍याचे काम पडले, तर अपघातात डोक्‍याला मार लागून अंतर्गत रक्‍तस्‍त्राव झाला, ब्रेन हॅम्रेज झाले, अर्धांगवायू झाला, तर आयुष्‍यभर अपंग होण्‍याची वेळ येते. म्‍हणून ज्‍या कॉंग्रेस सरकारने २०१३ मध्‍ये दीड लाख रुपयांची राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली होती.

त्‍यात भाजप सरकारने साडेतीन लाख जोडून आयुष्‍यमान भारत योजना जाहीर केली. त्‍याचा लाभ मात्र कुणाला मिळत नाही. सर्वसामान्‍य गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी ९७५ आजारांवर २५ लाखांपर्यंतचे आरोग्‍य विमा कवच आम्‍ही देणार आहोत. २५ लाखापर्यंत उपचाराचा आणि औषधाचा खर्च सरकार आणि विमा कंपनीच्‍या वतीने करण्‍यात येणार आहे, असे त्‍यांनी आपल्‍या भाषणात म्‍हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhamangaon railway assembly constituency congress candidate virendra jagtap controversial viral video saying farmers drink alcohol and faces health issues mma 73 asj