नागपूर : – धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा करण्यात आला. यंदा दीक्षाभूमी स्मारक समितीने मंचावर कोणत्याही राजकीय नेत्याला बोलविनार नाही असा निश्चय केला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात मंचावर भिख्खू संघाची उपस्थिती होती. मंचावर एकही राजकीय नेता नव्हता. मात्र अशा स्थितीत देखील मंचावर मोठा वाद झाला आणि काही वेळासाठी कार्यक्रमात व्यत्यय आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले. ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी सायंकाळी ६ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थित सुरू झाला. यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले गेले नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून कुशीनगर, उत्तरप्रदेश येथील भिक्खू संघाचे अध्यक्ष भंदत ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा उपस्थित राहतील. भदंत ज्ञानेश्वर हे बाबासाहेबांना दीक्षा देणारे भदंत चंद्रमणी महास्थवीर यांचे शिष्य आहेत. याशिवाय मंचावर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा >>>जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न
नेमके काय झाले?
मुख्य सोहळ्यात मंचावर एक एक करून भिख्खू मनोगत व्यक्त करत होते. भंते ज्ञानज्योती धम्म उपदेश देत होते. खूप वेळ पासून बोलत असल्याने सूत्र संचालन करणाऱ्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. याच वेळा एका दुसऱ्या भंते यांनी माईक हातात घेतला आणि भंते ज्ञानज्योती यांना बोलू का दिले जात नाही आहेत असे विचारले. दोघांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. समितीतील सदस्य विलास गजघटे आणि इतर भंते यांनी परिस्थिती सांभाळन्याचा प्रयत्न केला. मात्र इतक्या मोठ्या मंचावर असा वाद झाल्याने उपस्थित उपासक यांनी घटनेची निंदा केली.
हेही वाचा >>>संघाची भाजपला विचारणा, ‘निवडणुकीत काय मदत पाहिजे…’
अनुयायी मात्र शिस्तबध्द
धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखो अनुयायांचे आगमन शहरात झाले. दीक्षाभूमीकडे जाणारे रस्ते भीम अनुयायांनी गजबजले आहेत. दीक्षाभूमी स्तुपात जाण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. एकीकडे समितीमधील वाद मुख्य सोहळ्याचा मंचावर बघायला मिळाला तर दुसरीकडे इतकी मोठी गर्दी असताना देखील दीक्षाभूमीमध्ये अनुयायांमध्ये कमालीची शिस्तबद्धता बघायला मिळाली. या अनुयायांच्या सेवेसाठी तरुणाईही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे चित्र दीक्षाभूमीत बघायला मिळत होते.