नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी सायंकाळी ६ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले जाणार नाही.

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून कुशीनगर, उत्तरप्रदेश येथील भिक्खू संघाचे अध्यक्ष भंदत ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा उपस्थित राहतील. भदंत ज्ञानेश्वर हे बाबासाहेबांना दीक्षा देणारे भदंत चंद्रमणी महास्थवीर यांचे शिष्य आहेत. याशिवाय मंचावर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचीही उपस्थिती राहील, धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यावर पावसाचे सावट असल्यामुळे प्रशासन आणि स्मारक समितीच्यावतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आयटीआय परिसरात प्रशासनाने अनुयायांच्या निवाऱ्यासाठी मोठे मंडप टाकले आहेत. याशिवाय अधिक पाऊस झाल्यास परिसरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांनाही उघडण्यात येईल.

हेही वाचा – RSS Marks 100 Years : भर पावसात झाले संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

जपानी नागरिकांना दीक्षा

धम्मदीक्षा सोहळ्यात काही जपानी नागरिकांनाही दीक्षा देण्यात आली. दीक्षा घेण्यापूर्वी जपानी लोकांनी दीक्षाभूमी स्तुपात बाबासाहेबांना अभिवादन केले. याशिवाय बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूसह इतर राज्यातील लोकांनाही दीक्षा दिली गेली. शुक्रवारी सुमारे दहा हजार लोकांनी दीक्षा घेतल्याची माहिती आहे. यंदा दीक्षाभूमीवर ५० हजार लोकांद्वारे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली जाण्याचा अंदाज आहे.

समता सैनिक दलाकडून मानवंदना

शुक्रवारी सकाळी ९ वाजता धम्मदीक्षा सोहळ्याच्या मुख्य मंचाजवळ पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर समता सैनिक दलाने पथसंचालन केले आणि मानवंदना दिली. सायंकाळी मुख्य मंचावर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी सकाळी ९ वाजता विशेष बुद्ध वंदना घेतली गेली, त्यानंतर बावीस प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले. शहरातील सर्व बुद्ध विहारात एकाच वेळी चुद्धवंदना घेण्याचे आवाहन स्मारक समितीने केले होते.

हेही वाचा – OTT प्लॅटफॉर्म्सवर सरसंघचालक मोहन भागवतांचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “जे सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स…”

संविधानाला सर्वाधिक मागणी

दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीवर यंदाही दोनशेच्यावर पुस्तकांची दुकाने लावण्यात आली आहेत. यात बुद्ध, फुले, कबीर, आंबेडकर, पेरियार या महापुरुषांवर आधारित पुस्तके आहेत. भारताचे संविधान तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाला सर्वाधिक मागणी असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. पुस्तकांशिवाय धातूच्या मूर्तींनाही मोठी मागणी आहे. या मूर्तीच्या किंमती पाचशे रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत आहेत.