नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखो अनुयायांचे आगमन शहरात झाले आहे. दीक्षाभूमीकडे जाणारे रस्ते भीम अनुयायांनी गजबजले आहेत. दीक्षाभूमी स्तुपात जाण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. इतकी मोठी गर्दी असताना देखील दीक्षाभूमीमध्ये अनुयायांमध्ये कमालीची शिस्तबद्धता दिसत आहे. या अनुयायांच्या सेवेसाठी तरुणाईही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे चित्र दीक्षाभूमीत बघायला मिळत आहे.

धम्मदीक्षा सोहळ्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येत अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यामधील बहुतांश अनुयायी ग्रामीण भागातून येतात. त्यामुळे त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येत स्टॉल लावले जातात. तरुणाई मोठ्या प्रमाणात या स्टॉल मार्फत लोकांमध्ये जनजागृती करताना दिसत आहे. अनेक संघटनांच्या मार्फत पथनाट्याच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. विविध वैद्यकीय कॅम्पमध्येही तरुण दिसत आहेत. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थीनी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या माध्यमातून अनुयायांच्या सेवेत लागले आहे. समता सैनिक दलामध्ये देखील लहान मुले आणि तरुण काठी घेऊन दीक्षाभूमीवर शिस्त आणि शांतता भंग होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत. शासकीय रुग्णालय, मेयो रुग्णालय, दंत महाविद्यालय, लता मंगेशकर रुग्णालयामधील तरुण डॉक्टर्स अनुयायांच्या सेवेत रुजु आहेत. शहरातील सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया आणि मेयो रुग्णालयाच्या मार्फत सिकलसेलबाबत जनजागृती केली जात आहे. किशोर राऊत या तरुणाने सांगितले की आंबेडकरी समाजातील तरुणांमध्ये सिकलसेलबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. तरुणांच्या मार्फत तरुणांना माहिती दिल्यास ते अधिक लक्ष देऊन ऐकतात, त्यामुळे आमच्या समूहात मोठ्या प्रमाणात तरुण दिसत आहेत.

हे ही वाचा… दीक्षाभूमीचा स्तुप दिसतो सुंदर…पण्, त्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा संघर्ष…

दीक्षाभूमी ‘धम्ममय’

  • अनुयायांना माहिती देण्यासाठी महापालिकेमार्फत दीक्षाभूमीत चौकात एलएडी स्क्रीनची व्यवस्था केली गेली आहे.
  • दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात पुस्तकांची दुकाने आहेत. अनेक संघटनांच्या मार्फत बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान ३० रुपयात दिले जात आहे.
  • जयभीमचा लोगो आणि बाबासाहेबांचे चित्र असलेले टी-शर्ट, टोपी याची मोठ्या प्रमाणात दुकाने बघायला मिळत आहेत. महिला वर्गासाठी पांढऱ्या शुभ्र साड्यांची दुकाने आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
  • भगवान बुद्ध मुर्ती, आंबेडकर मुर्तींची विक्री देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. २ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत या मुर्तींची किंमत आहे.
  • दीक्षाभूमीमधील होणाऱ्या कार्यक्रमाची थेट प्रक्षेपणाची व्यवस्था समितीमार्फत करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात यासाठी जागोजागी एलएडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.