लोकसत्ता टीम
चंद्रपूर : विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्रीय व कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करण्याची धानोरकर कुटूंबाची परंपरा राहिली आहे. सोळाव्या फेरीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा २ लाख ४ हजार ३०० चे मताधिक्य घेवून विजयाच्या मार्गाने निघालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ही परंपरा कायम राखली आहे. मंत्र्यांचा पराभव करण्याची धानोरकर कुटूंबाची परंपरा व इतिहास पुन्हा कायम राखला गेला आहे अशी प्रतिक्रिया आमदार धानोरकर यांनी व्यक्त केली.
मंगळवारी सकाळी ८ वाजता पासून एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्याच फेरीत मुनगंटीवार यांच्यावर दहा हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीत वाढत गेली. एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना कॉग्रेस उमेदवार धानोरकर यांनी दिड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील मोठे नेते असून त्यांना राजकारणाचा ३० ते ४० वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे साधे नव्हते.
आणखी वाचा-वर्धा : मविआचे अमर काळे यांची विजयाच्या दिशेने आगेकूच, महायुतीचे तडस समर्थक आता मोर्शीवर आस लावून
मात्र, आतापर्यंत लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो धानोरकर कुटूंबियांनी थेट मंत्र्यांना पराभूत केल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे, २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत स्व.बाळू धानोरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवितांना तेव्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा काँग्रेस उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्व. खासदार बाळू धानोरकर यांनी थेट केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले होते.
मोदी लाटेत राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले. तसेच विधानसभा निवडणूकीत वरोरा मतदार संघात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव करीत निवडून आल्या आहेत. तर आता २०२४ च्याा लोकसभा निवडणुकीत आ. प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर २ लाख ४ हजार ३०० मतांची आघाडी घेत विजयी मार्ग सुकर केला आहे. त्यामुळे धानोरकर कुटूंबियांनी मंत्र्यांना पराभूत केल्याची हॅट्रीक साधली जात आहे. स्व.बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर कुटूंबियांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मंत्र्यांचा पराभव केल्याचा इतिहास या विजयाने कायम राखल्या गेल्याचे मत आ. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
स्व. बाळू धानोरकर मनाने सोबत
आज स्व. खासदार बाळू धानोकर शरीराने आपल्या सोबत नसले तरी, विचार व मनाने ते आपल्या सोबत आहे. त्यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात उतरविली. त्यामुळे हा विजय संपादन करता आल्याचे मत आ. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
माझा विजय हा निश्चितच होता. मात्र, इतक्या मताधिक्याने विजय होईल याबाबत खात्री नव्हती. मात्र, एक ते दिड लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावाही धानोरकर यांनी यावेळी केला. हा विजय माझ्या एकटीचा नसून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा हा विजय असल्याचे त्या म्हणाल्या.