नागपूर : धंतोलीमध्ये रुग्णालयांमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना महापालिकेने गेल्या वर्षभरात येथे पुन्हा ११ नवीन रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अमर्यादित रुग्णालयांमुळे धंतोली आणि रामदासपेठ भागात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: धंतोलीत गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. अनेक रुग्णालयांनी वाहनतळाच्या जागेवर औषधालय, लॉन्ड्री करणे, ऑक्सिजन प्लांट, चेंबर तयार केले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. यामुळे धंतोलीच्या गल्लीबोळात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते.

धंतोली-रामदासपेठ भागात सुमारे ११५ रुग्णालये व क्लिनिक आहेत. त्यामुळे या भागात आणखी रुग्णालय बांधण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी धंतोली येथील नागरिकांची आहे. परंतु महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करीत २०२४ मध्ये आणखी ११ रुग्णालयांना परवानगी दिली. याबाबत महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशीलानुसार, शहरातील ६५४ खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे नोंद केली. यात ९८९ क्लिनिक आणि २११ पॅथलॅब आहेत. केवळ धंतोलीत ६२ रुग्णालयांची नोंद आहे. यात २०२४ मध्ये पुन्हा ११ नवीन रुग्णालयांची भर पडली आहे.

नोंदीपेक्षा अधिक रुग्णालये

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या नोंदीपेक्षा अधिक रुग्णालये आणि क्लिनिक या भागात सुरू आहेत. त्यांच्याकडे वाहनतळ नसल्याने या वसाहतीमधील नागरिकांना वाहतूक कोडींच्या समस्येला सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त इतर दुकाने, खाद्यपदार्थ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर झाली आहे.

Story img Loader