धरमपेठ शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गेल्या बैठकीचे इतिवृत्त फेटाळण्याच्या प्रस्तावावर मतदान होऊन तो बहुमताने फेटाळण्यात आला. इतिवृत्त मंजूर न करता ते फेटाळले गेल्याने संस्थेचे अध्यक्षच अल्पमतात आल्याची संस्थेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून या निमित्ताने संस्थेतील वाद चव्हाटय़ावर आला आहे.
या संस्थेची सर्वसाधारण सभा (एजीएम) नुकतीच पार पडली. तीत गेल्या बैठकीतील इतिवृत्ताला मंजुरी न देता फेटाळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यावर मतदान होऊन तो फेटाळण्यातही आला. संस्थेचे सुमारे १२५ सदस्य आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांना संस्था चालवताना नियमांची प्रतिपूर्ती करणे आवश्यक असते, याचे जुजबी ज्ञान नसल्याचे या घटनेवरून उघड झाले. विद्यमान अध्यक्ष रवींद्र जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे प्रचारक आहेत. असे असताना कुठलाही गाजावाजा न करता शांतपणे काम करणाऱ्या धरमपेठ शिक्षण संस्थेत आता वाक्युद्ध घडायला लागल्याने सर्वच काही आलबेल नसल्याचे दिसून आले.
गेल्या बैठकीचे इतिवृत्त चर्चेला आले तेव्हा त्यात अनेक त्रुटी होत्या. श्रीमती सहस्रभोजनी नावाऐवजी पूर्ण नाव का लिहिले गेले नाही, प्राध्यापक किंवा सदस्यांच्या नावातील चुका काही सदस्यांनी उपस्थित केल्याने चर्चा वाढली. तसेच एखाद्या शाळेतील व्यक्तीला काढायचे किंवा त्या ठिकाणी नियुक्ती करण्याच्या मुद्यावरही सदस्यांचा आक्षेप होता. तोही इतिवृत्तात समाविष्ट होता. मात्र, आपल्याला संस्थेचे पदाधिकारी नेमल्याने आपण म्हणू ती पूर्व दिशा, असा काहींचा गैरसमज झाला आणि त्यांचे सभा हाताळण्याविषयीचे अज्ञान चव्हाटय़ावर आले. संस्थेच्या गेल्या १८ सप्टेंबरला पार पडलेल्या सभेला ३० सदस्य उपस्थित होते. ‘इतिवृत्त फेटाळण्यात यावे’ या प्रस्तावाच्या बाजूने जास्त हात वर गेले. विरोधातील हात कमी होते, तर दोनजण तटस्थ राहिले. त्या गोंधळात नेमके आकडे गोळा करण्यात आले नाहीत.
या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जोशी म्हणाले, सभा पूर्ण झाली नसून ती स्थगित करण्यात आली आहे. सदस्य इतिवृत्तावर फारच संवेदनशील होते. सचिवांनी मागच्या सभेचा अहवाल लिहिला. त्यात अनेक त्रुटी राहिल्या. त्यासाठी पुढची सभा लवकरच होईल. सर्वसाधारण सभा संस्थेचा अंतर्गत प्रश्न आहे. काहींशी मतभिन्नता आहे. सदस्य पुढच्या वेळी काहीतरी करतीलच. काहीच लोकांचा विषय आहे. हत्ती एका बाजूने पाहिला तर शेपटी, कान, असेच अवयव दिसतील. त्यामुळे हत्ती सगळ्या बाजूंनी पाहा, असे आवाहन मी करणार आहे. ४ मे २०१३ ला मी अध्यक्ष झालो तेव्हापासून पारदर्शकता, मूल्यमापन आणि सहभाग या त्रिसूत्रीवर काम करीत आहे. साडेपाचची सभा ५.४० वाजता सुरू झाली तेव्हा साडेपाच न लिहिता ५.४० लिहिले पाहिजे, यासाठी काही सदस्य अडून होते. अनेकांचा कल वेगळा होता. काही प्रयत्नपूर्वक आणले होते. अशा तापलेल्या वातावरणात धूळ उडाली असताना चांगले सांगण्यात काही अर्थ नव्हता.

इतिवृत्त मंजूर करताना..
इतिवृत्त मंजुरीसाठी प्रस्ताव आधी मांडण्यात येतो. तो बहुमताने मंजूर होत असेल तर प्रश्न नाही, पण त्यावर आक्षेप असतील तर तो कसा हवा, याचे उत्तर सभेतील सदस्यांकडूनच घेऊन तो मंजूर करण्याचा शक्यतो प्रयत्न केला जातो. तो स्वीकारायचा की फेटाळायचा, यावर मतदान घेतले जाते. तो फेटाळणे म्हणजे पूर्ण प्राधिकरणाचे काम करण्यास लायक नसणे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच, अविश्वास दाखवल्यासारखे होय, हे बैठक घेणाऱ्यांना समजले नाही.