नागपूर : राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित रुग्णशय्या गरीब रुग्णांना उपलब्ध करणे, त्यावर देखरेखीसाठी शासनाने ३१ ऑक्टोबरला राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या अखत्यारित प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक समितीही राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात एकूण ४६८ धर्मादाय रुग्णालये आहेत. या रुग्णालयांना नियमानुसार दहा टक्के रुग्णशय्या निर्धन वर्गासाठी मोफत तर १० टक्के रुग्णशय्या आर्थिक दुर्बल घटकासाठी ५० टक्के सवलतीच्या दरात आरक्षित करणे बंधनकारक आहे. परंतु, राज्यातील काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना या सवलतीच्या रुग्णशय्या मिळत नसल्याच्या सातत्याने शासनाकडे तक्रारी येत होत्या.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

शासनाकडून या धर्मादाय रुग्णालयांना अनेक सवलती दिल्या जातात. परंतु, ही रुग्णालये नियमाप्रमाने २० टक्के आरक्षित रुग्णशय्यांवर पारदर्शीपणे संबंधित रुग्णांवर उपचार करत नव्हते. त्यामुळे राज्यातील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर चांगला उपचार व्हावा म्हणून शासनाने ३१ ऑक्टोबरला धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापना केली आहे. त्याचे प्रमुख रामेश्वर नाईक राहतील. हा कक्ष राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयांतील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शकपणे मिळवण्यासाठी मदत करेल. त्यासाठी एक ऑनलाईन रुग्णालयनिहाय दाखल रुग्णांची माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ही तयार केली आहे. या ‘डॅशबोर्ड’वर संबंधित धर्मादाय रुग्णालयांना आरक्षित खाटांवर दाखल रुग्णांची माहिती टाकावी लागेल. राज्यातील मदत कक्षाच्या अखत्यारित प्रत्येक जिल्ह्यात एक समिती राहील. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार असून त्यात जिल्ह्यातील दोन विधानसभा अथवा विधानपरिषदेचे सदस्य राहतील. सोबत संबंधित जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, सहायक धर्मादाय आयुक्त, एक समाजसेवक, वैद्यकीय क्षेत्रातील दोन तज्ज्ञ, जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षकांचाही समावेश असेल.

हेही वाचा – लोकजागर- सत्तालोलुप ‘समाजप्रेम’!

धर्मादाय रुग्णालयावर देखरेखीसाठी तयार राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष सर्व निर्धन व दुर्बल घटकातील गरीब रुग्णांना नि:शुल्क व माफक उपचारासाठी मदत करेल. या कामासाठी ऑनलाईन ‘डॅशबोर्ड’ आणि मदत क्रमांकाचीही मदत मिळेल. एखाद्या रुग्णाने मदत क्रमांकावर संपर्क केल्यास तातडीने रुग्णांना दाखल करण्यासाठी जवळचे रुग्णालय सांगत तेथेही रुग्णाबाबत सूचना केली जाईल. त्याने रुग्णाला लवकर उपचार मिळेल. – रामेश्वर नाईक, प्रमुख, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharmaday hospitals in the maharashtra are now under the watchful eye of the special help desk mnb 82 ssb
Show comments