गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात पेटलेल्या वादाने नवे वळण घेतले आहे. मंत्री आत्राम यांनी उद्या अहेरी येथील त्यांच्या राजवाड्यावर पत्रकार परिषद बोलवली असून ते वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर पुरावे सादर करणार असल्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज दुपारनंतर थंडावल्या परंतु यादरम्यान नेत्यांमध्ये उद्भवलेला वाद अद्याप शमलेला नाही. प्रचारादरम्यान वडेट्टीवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली होती. त्यानंतर आत्राम यांनी सुद्धा वडेट्टीवार लवकरच भाजप प्रवेश करणार असा दावा करून खळबळ उडवून दिली. संपूर्ण प्रचारादरम्यान या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. यामुळे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात उमेदवार सोडून या दोन नेत्यांचीच अधिक चर्चा पहायला मिळाली.
हेही वाचा…बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
वडेट्टीवार यांनी आत्राम यांच्यावर एकेरी भाषेत खालच्या पातळीची टीका केली. एका ज्येष्ठ आदिवासी नेत्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दावर आदिवासी समाजात आणि राजकीय वर्तुळात नाराजीदेखील व्यक्त केल्या गेली. दुसरीकडे आत्राम हे आपल्या दाव्यावर ठाम असून वडेट्टीवार आणि भाजप नेत्यांची बैठक कुठे झाली. त्यात प्रवेशासंदर्भात काय चर्चा झाली. याचा तपशील पुराव्यासह उघड करणार आहेत. उद्या, १८ एप्रिल रोजी आत्राम यांनी आपल्या अहेरी येथील राजवाड्यावर पत्रकार परिषद बोलवली आहे. त्यात ते वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात माध्यमासमोर पुरावे सादर करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून आत्राम यांच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.