लोकसत्ता टीम
नागपूर : मंत्री बनणे माझ्या नशिबात आहे. चार वेळा निवडून आलो चार वेळा मंत्री झालो. आता ही मी मंत्री होणार. पण अजितदादांनी अडीच वर्ष थांबायला सांगितले, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. भुजबळ यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. काही जणांना अडीच वर्ष थांबायला सांगितले. विदर्भातील राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे त्यापैकीच एक. ते म्हणाले मी मंत्री होणारच. मी अजित दादा सोबत मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे. अडीच वर्ष थांबायचं. वाट पाहत आहोत.
आणखी वाचा-वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…
पवारांकडून संघाचे कौतूक
पुरोगामी विचाराचे असले तरी शरद पवार यांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलं. शरद पवार यांनी आमच्यासोबत यावं हे सगळ्यांचे मत आहे. त्यामुळे पक्ष मजबूत होईल. महाराष्ट्रात आणि दिल्लीत ताकद वाढेल. राजकारणात नाराजी चालत राहते, जन्मदिवसाच्या दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. अजितदादांच्या आईने सुद्धा इच्छा व्यक्त केली. विरोधी पक्षात राहून विकास होत नाही. त्यामुळे एकत्र याव, असे आत्राम म्हणाले.
मुंडेंची पाठराखण
धनंजय मुंडे संदर्भात जी काही चौकशी सुरू आहे, त्यातून सत्य पुढे येईल. पण विरोधक आरोप करतात म्हणून त्यांना राजीनामा मागता येऊ शकत नाही. आरोप सिद्ध झालं धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. हत्येची घटना नक्कीच चुकीची आहे. त्यांचा एक टक्का जरी सहभाग आहे असं वाटले तर दादा राजीनामा घेतील सध्या राजीनामा देणे गरजेचे नाही.या शब्दात आत्राम यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
आणखी वाचा-नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
भुजबळ नाराज
शरद पवार आणि भुजबळ यांच्यात काय झालं ते आम्हालाही कळलं नाही. मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज होणं स्वाभाविक आहे. पक्ष संघटनेचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी मजबूत करणार जिल्हा परिषद हातात आणण्यासाठी प्रयत्न करणार, असे आत्राम म्हणाले.