राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर हे तक्राकर्त्या प्राध्यापकांना पैसे मागत असल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे. यातील एका ध्वनिफितीत धवनकर पाच ते सहा दिवसांत पैसे जमा करा असे सांगत आहेत, तर दुसऱ्या ध्वनिफितीत धवनकर पैसे घेतल्याची कबुली देत असून तक्रारकर्त्यांशी तडजोडीसाठी एका अधिसभा सदस्याला विनवणी करत आहेत.
डॉ. धवनकर यांनी सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याची तक्रार आहे. यासदंर्भात शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चाही सुरू आहेत. हे सात प्राध्यापक धवनकर यांच्या जाळ्यात कसे सापडले, त्यांच्यावर कुठला दबाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, या प्रकरणातील ध्वनिफीतच लोकसत्ताच्या हाती लागल्याने धवनकर यांनी कशाप्रकारे या प्राध्यापकांची फसवणूक केली याचा पुरावाच समोर आला आहे. या प्रकरणातील दोन ध्वनिफिती लोकसत्ताच्या हाती लागल्या. यातील पहिल्या आठ मिनिटांच्या ध्वनिफीतमध्ये धवनकर तक्रारकर्त्यांपैकी एका प्राध्यापकाला म्हणतात, ‘‘यावेळी ते अजून काम झाले नाही, अडीच द्यायचे होते’’ यावर प्राध्यापक म्हणतो, ‘‘एकावेळी इतके पैसे देणे होणार नाही. मी दोन करून देतो. काही दिवसांची मुदत द्या’’. यावर धवनकर म्हणतात, ‘‘काही हरकत नाही, तुमच्यासाठी मी दोन अंतिम करून देतो. मात्र, चार दिवसांत द्या’’ याशिवाय या देवाण-घेवाणीसंदर्भात अनेक चर्चाही यामध्ये आहेत. दुसऱ्या ध्वनिफीतीत धवनकर हे चार प्राध्यापकांकडून पैसे घेतले असून त्यांच्याशी तडजोड करण्याची कबुली देत आहेत. या ध्वनिफीतमुळे धवनकर प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून ठोस पुराव्यानंतर विद्यापीठ आता काय कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा >>>अबब… १२० किलोचे कासव; “तो” आमच्या देवाचा, आमच्या तलावात परत सोडा
ध्वनिफितीतील संवाद काय?
दुसऱ्या ध्वनिफितीत धवनकर आणि अधिसभेमध्ये प्राध्यापक प्रवर्गातून निवडणूक आलेल्या सदस्यांमध्ये ४९ मिनिटांचा संवाद आहे. अधिसभा मतदानाच्या तीन दिवसांआधीचा हा संवाद आहे. यात धवनकर तडजोड करण्यासाठी या सदस्याला विनंती करीत आहेत. ‘‘माझाकडून चूक झाली. प्रसार माध्यमांमध्ये तीन दिवसांपासून येत असलेल्या वृत्तामुळे माझी प्रचंड बदनामी झाली. ज्या चार लोकांकडून मी घेतले त्यांना परत करायला तयार आहे. इंदूरवाडे, लेंडे यांनी तर दिलेच नाहीत. ज्या चार लोकांनी दिले त्यांना परत करतो. मात्र, माझी या प्रकरणातून सुटका करा. मला जी शिक्षा मिळाली ती खूप मोठी आहे. यापेक्षा अजून काय शिक्षा करणार? प्रचंड मनस्ताप होतो आहे, आपण मेश्राम साहेबांशीही बोलू’’ असे अनेक संवाद या ध्वनिफीतमध्ये आहेत.