अमरावती : नाट्यमय घडामोडींनंतर अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस कडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लिंगाडे यांनी काल रात्रीच ठाकरे गटातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ते ठाकरे गटाचे बुलडाण्याचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. महाविकास आघाडीनेही लिंगाडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘आपण काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार असलो तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत समन्वय आहे, असे धिरज लिंगाडे यांनी सांगितले आहे. सुरुवातीला अमरावती पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेस तर्फे माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर मिलिंद चिमोटे यांचे नाव चर्चेत आले. दोघांनीही उमेदवारीसाठी नकार दिल्याची माहिती आहे. काँग्रेसतर्फे कोणाचे नाव जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा >>> महाविकास आघाडीचे काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम जेल’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांना तर तीन महिने आधीच कामाला लागण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. पण ही सर्व नावे अचानक मागे पडली आणि काँगेसने अनपेक्षितपणे धीरज लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दीड वर्षाआधीपासूनच तयारी सुरू केली हाेती. शिवेसनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी मतदार नोंदणी, बैठकांसह इतर गोष्टींच्या सर्व जबाबदाऱ्या धीरज लिंगाडे यांच्याकडेच दिल्या होत्या. यातून लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असतील, असे संकेत दिले होते.
हेही वाचा >>> नागपूर : अरे बापरे! गुप्तांगामध्ये लपवून आणले तब्बल सव्वा किलो सोने अन्…
राज्यातील सत्तांतरानंतरही लिंगाडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. पण अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार काँग्रेसच्या कोट्यात दिला आहे. धीरज लिंगाडे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील व धीरज लिंगाडे यांच्यात थेट लढत होणार, असे मानले जात आहे.