लोकसत्ता टीम
चंद्रपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन, पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सज्ज झाली आहे. रविवार व सोमवारी दीक्षाभूमीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र तथा लगतच्या राज्यातील हजारो बौद्ध समाज बांधव दीक्षाभूमीवर दाखल होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन व धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या तेजस्वी दिनाच्या स्मरणार्थ रविवार १५ व सोमवार १६ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-नागपूर : नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट! रुग्णसंख्या ७७६ वर
रविवारी दुपारी ४ वा. विश्वशांती, बंधुत्व प्रेरित वाहनासह मिरवणूक, ४:३० वा. धम्म ध्वजारोहण, सायं. ४.४० वा. धम्मज्योत प्रज्वलन, दुपारी ४:५० वा. सामूहिक बुद्धवंदना, स्फूर्तीगाण, अतिथींचे स्वागत आणि धम्म प्रवचन, सायं ८:०० वाजता जाधव सिस्टर्स आणि संच यांचा जागर समतेचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम, तर सोमवारी सकाळी १० वाजता शहराच्या मध्यभागी स्थित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व पवित्र अस्थिधातूकलशासह वंदनीय भिक्खूगण, समता सैनिक दलाचे पथसंचलनासह आकर्षक भव्य मिरवणुकीद्वारे पवित्र दीक्षाभूमीकडे प्रस्थान, सकाळी ११ वा. ‘बुद्धधम्म आणि आधुनिक विज्ञान’ या विषयावर परिसंवाद, दुपारी १:३० वा. सामूहिक बुद्धवंदना, सायं. ५ वा. मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आणखी वाचा-ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांचा १ नोव्हेंबरला मोर्चा; सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप
मुख्य समारंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, प्रमुख अतिथी श्रद्धेय भदन्त डॉ. वण्णासामी, अरुणाचल प्रदेश, श्रद्धेय भदन्त सारीपुत्त, म्यानमार (ब्रह्मदेश), विशेष अतिथी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार ॲड. अभिजित वंजारी, प्रधान सचिव मुकेशकुमार मेश्राम आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, डॉ. प्रदीप आगलावे आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ वाजता आकांक्षा नगरकर आणि संच नागपूर यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम होईल.