नागपूर : ‘तुम्ही बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरुद्ध बोलणे थांबवले नाही तर तुमचा आम्ही नरेंद्र दाभोळकर करू’ अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे. बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि श्याम मानव यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत असून हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पाठिंबा दिला आहे. श्याम मानव यांच्या जीवितास कुठलाही धोका उद्भवू नये, या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चमत्कार करुन जोशीमठची दुभंगलेली जमीन जोडून दाखवा; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या ‘प्रेत दरबार’ आणि ‘दिव्य दरबार’वर आक्षेप घेऊन अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. दिव्यशक्ती आणि चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास ३० लाखांचे बक्षीस देण्याचे आव्हानही श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना दिले होते. श्याम मानव यांनी थेट शास्त्री यांच्या दिव्यशक्तीला आव्हान देत राज्यात जादूटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी रायपूरमध्ये जाऊन ‘तुम्ही भक्तांच्या आड का लपता?’ असा सवालही श्याम मानव यांनी केला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांना ‘तो’ कायदा ठरणार अडचणीचा…

तुमच्यामध्ये दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरमध्ये येऊन तुमची शक्ती सिद्ध करा’ असे आव्हान श्याम मानव यांनी दिले होते. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी रायपूरमध्ये आव्हान स्वीकारून श्याम मानव यांना रायपूरला येण्यास सांगितले होते. धीरेंद्र शास्त्री आणि श्याम मानव यांच्यातील वाद वाढत जात असतानाच श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर एक धमकीचा मॅसेज आला. त्यामध्ये ‘तुम्ही धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध बोलणे थांबवा, अन्यथा तुमचा नरेंद्र दाभोळकर करू,’ अशी धमकी दिली. धमकी मिळताच त्यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सदरचे ठाणेदार विनोद चौधरी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी लगेच श्याम मानव यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. त्यांच्यासोबत आणखी चार सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रविभवन येथेही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhirendra krishna shastri maharaj criticism threatens shyam manav of anis adk 83 ysh