नागपूर: २ जानेवारी १९४० या दिवशी कराडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉ. आंबेडकरांनी भेट दिली त्या श्री भवानी संघ स्थानावर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे करण्यात आले होते. ‘हिंदू संघटनेशिवय जातीभेद नष्ट होणार नाहीत’ असे डॉ. आंबेडकरांचे विचार होते. त्याचप्रमाणे ‘सकल हिंदू, बंधू बंधू’ या विचाराने रा. स्व. संघ हिंदू संघटनेचे काम करत आहे असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी कार्यक्रमादरम्यान केले. बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिल्याच्या घटनेवरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी खरच संघाच्या शाखेला भेट दिली होती का? याला संदर्भ काय? हे बघूया…
बाबासाहेबांच्या भेटीचा संदर्भ काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती असा दावा करत या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून त्याच जागेवर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे करण्यात आले. संघाच्या विश्व संवाद केंद्राने ही माहिती प्रसारित केली असून त्याला केसरी वृत्तपत्रामधील माहितीचा आधार देण्यात आला असल्याचे प्रदेश बसपचे माध्यम प्रभारी उत्तम शेवडे यांनी सांगितला आहे. तसेच संघाच्या या माहितीवर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा – संघाचे आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष
हेही वाचा – संमेलनाच्या प्रवेशद्वारास सावरकरांचे नाव! साहित्यप्रेमींच्या मागणीची महामंडळाकडून दखल
माहिती खोटी असल्याचा आक्षेप काय?
प्रदेश बसपचे माध्यम प्रभारी उत्तम शेवडे यांनी सांगितले की, संघाने बाबासाहेबांच्या भेटीचा दावा करताना ९ जानेवारी १९४० च्या केशरी वृत्तपत्राचा उल्लेख केला आहे. परंतु, आंबेडकरांनी प्रकाशित केलेल्या २० जानेवारी १९४० च्या जनता पत्रकाचा तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणे खंड १८ भाग दोनमध्ये पान नंबर ३१२ वर क्रमांक १७० मध्ये बाबासाहेबांचे एका वेगळ्या कार्यक्रमातील भाषण देण्यात आले आहे. तसेच टिळकाच्या नेतृत्वाखालील केसरी वृत्तपत्राला बाबासाहेबांनी आपल्या साप्ताहिकाची जाहिरात छापण्यासाठी मनीऑर्डर व जाहिरात मजकूर पाठवला होता. परंतु, केशरीने ती जाहिरात छापण्याचे नाकारले हा इतिहास आहे. त्यामुळे केसरी बाबासाहेबांच्या भेटीचा वृत्तांत कसा छापतील? असा उपरोधिक प्रश्न उत्तम शेवडे यांनी केला. बाबासाहेब हे कराड नगरपरिषदेने देऊ केलेल्या मानपत्र समारंभात उपस्थित होते. रस्त्यात त्यांचा अपघातही झाला असतानाही त्यांनी कार्यक्रमात भाषण दिले. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधी निवडीसाठी स्वतः बाबासाहेबांनी महारवाड्यातील एका सभेला संबोधित केले. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह साताऱ्याला परत गेले. त्यामुळे संघाच्या शाखेला भेट दिल्याची माहिती खोटी आहे. संघाच्या विश्व संवाद केंद्राने खोटी व दिशाभूल करणारी निराधार माहिती पसरवल्याचा आक्षेप शेवडे यांनी घेतला.