वर्धा : राजकारणात धुरळा उडवून देण्याचे काम एक फंडाच समजल्या जातो. त्यामुळे कोण कुणाची कशी फसगत करेल, हे सांगता येत नाही. समाज माध्यमातून मेट हिरजी येथील सरपंच पुष्पाताई चारोडे व सुसुंद येथील सरपंच अंकुश ठाकरे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. हे दोन्ही सरपंच खरे तर काँग्रसचे. मग भगवा व कमळ दुपट्टा घालून यांनी भाजपा प्रवेश कसा केला, असा प्रश्न काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पडला.
काळे यांनी या दोघांना विचारले तेव्हा आज बनवाबनवी उघड झाली. काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी सांगितले की, आमच्या गळ्यात भाजपा आमदार ( दादाराव केचे ) यांनी जबरदस्तीने त्यांच्या पक्षाचा दुपट्टा टाकला. आम्ही तर काँग्रेसचेच एकनिष्ठ आहोत व राहणार. हा खुलासा आज जाहीर झाल्याने कारंजा तालुक्यात बनवाबनवीपासून सतर्क राहण्याची चर्चा सुरू झाली आहे.