अकोला : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना चर्चेचे व निर्णयाचे अधिकार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या प्रभारींनी सांगितले. पत्रावर नाना पटोले यांची स्वाक्षरी आहे. काँग्रेसने अगोदर स्पष्ट करावे, की नाना पटोलेंना अधिकार आहेत की नाही. त्यामुळे वंचितचा अद्याप ‘मविआ’त समावेश झालेला नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे दिली. ‘मविआ’तील प्रमुख तिन्ही घटक पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अकोल्यात बुधवारी दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मविआच्या बैठकीचे निमंत्रण मिळाल्याने त्यात सहभागी झालो. हे निमंत्रण चर्चेसाठी देण्यात आले होते, असे आम्ही समजतो. मात्र, त्यांचे काहीही ठरलेले नाही. ओबीसींचा त्यांच्या आरक्षणात इतरांना समाविष्ट करण्याला विरोध, मराठा आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे आंदोलन व तीन काळ्या कायद्यांना स्थगिती या सर्व मुद्द्यांवर ‘मविआ’तील प्रत्येक घटक पक्षांची भूमिका काय? हे जाहीर करावे, अशी मागणी आम्ही बैठकीत केली. किमान समान कार्यक्रम रहावा म्हणून २५ प्रमुख मुद्दे ‘मविआ’पुढे मांडले आहेत. प्रत्येक पक्षाने त्यावर चर्चा करावी, ही अपेक्षा आहे.’’
हेही वाचा – राज्यातील पावणेदोन लाख घरात केंद्राच्या ‘सूयोदय’ची सौरऊर्जा
केंद्रातील भाजपा सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये, ही आमची भूमिका आहे. भाजपा आणि संघविचारसरणी विरोधात आमची एकत्रित येण्याची तयारी आहे. त्यासाठी आमच्याकडून कुठलीही अडवणूक केली जाणार नाही, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ‘एआयसीसी’चे प्रतिनिधी म्हणून बोलण्याचे व निर्णयाचे अधिकार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले. पत्रावर त्या नेत्यांच्या स्वाक्षरी नसल्याने अद्याप ‘मविआ’तील समावेशाचा निर्णय झालेला नाही. उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी राज्यात निर्णय घेऊ शकतात, मात्र काँग्रेसला दिल्लीतून निर्णय घ्यावा लागेल. ‘एआयसीसी’ने वंचितच्या समावेशाला मान्यता द्यावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा – तिर्थक्षेत्र रिध्दपूर येथे नविन प्रवासी रेल्वे स्थानकास मंजुरी; खासदार तडस यांची माहिती
२ फेब्रुवारीला जागा वाटपाचा मसुदा द्यावा
‘मविआ’मध्ये जागा वाटपाचे काय ठरवले, याची माहिती द्यावी. त्यांचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असेलच, हे गृहीत धरून २ फेब्रुवारीच्या बैठकीत जागा वाटपाचा मसुदा द्यावा, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली. या बैठकीत वंचित आघाडी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.