गोंदिया : एकीकडे सरकार विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करताना दिसत आहे. पण, कमी निधीमुळे आरोग्य सेवेची चाके डळमळीत झाली आहेत. डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याने गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री जिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण वाहिकेची चाके थांबली आहेत.मंगळवार १६ एप्रिल रोजीच येथील के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेच्या मृत्यूनंतर ही बाब उघडकीस आली. रुग्णालयातील शेड खाली तीन रुग्णवाहिका धूळखात असल्याचे समोर आले.

रुग्णालय प्रशासनातील जबाबदार प्रशासनिक अधिकारी यांना या रुग्णवाहिकांबद्दल विचारणा केली असता, गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य विभागाला लागणाऱ्या इंधनासाठी निधी मिळालेला नाही, त्यामुळे रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उभ्या आहेत, असे सांगण्यात आले. एका रुग्णाला २५० रुपये अनुदान दिले जाते असे सांगण्यात आले. हे अनुदान खूपच तुटपुंजे आहे आणि त्यातही वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडे इंधनासाठी पैसे नाहीत. या समस्येबाबत अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला, परंतु काहीच झाले नाही. अशाप्रकारे अनुदान निधी लवकर मिळाला नाही, तर आणखी ही रुग्ण वाहिकांची चाके थांबण्याची शक्यता आहे.

या रुग्णवाहिकांची चाके थांबल्यामुळे, आदिवासीबहूल या मागासलेल्या जिल्ह्यात लांब अंतरावरून बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खाजगी वाहनांनी यावे लागत आहे, ज्याचा खर्च ते स्वतः च्या खिशातून करत असतात. या परिस्थितीत कधी सुधारणा होईल याचे कोणतेही उपाय देणारे उत्तर अद्याप तरी सापडलेले नाही.

मासिक खर्च १ लाख रुपयांपर्यंत…

रुग्णवाहिका ही एक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा आहे.जिच्या मदतीने गर्भवती महिला आणि अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात नेऊन त्यांचे जीव वाचवले जातात. बाई गंगाबाई जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.निकिता पोयाम यांनी माहिती देताना सांगितले की, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात एकूण ५६ रुग्णवाहिका आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेचा मासिक खर्च ८० हजार ते १ लाख रुपये आहे. पुरेशा निधीअभावी ही समस्या वाढत आहे. पुढील येत्या ८ ते १० दिवसांत शासनाने डिझेलसाठी निधी निधी न दिल्यास या ५६ रुग्णवाहिकांची चाके थांबण्याची शक्यता आहे.