लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : येथून जवळच असलेल्या भोयर घाटात डिझेल टँकर उलटून भीषण आग लागली. या घटनेत टँकरमधील एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीररित्या भाजले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील भोयर घाटात आज सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.

यवतमाळकडून डिझेल टँकर दारव्हाकडे जात होता. दरम्यान भोयर घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. टँकरमध्ये डिझेल असल्याने पलटल्यानंतर त्याने पेट घेतला. सोबतच परिसरातील जंगलाही आगेने कवेत घेतले. या घटनेनंतर यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण, लोहारा पोलीस, अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत टॅंकर पूर्णत: जळून खाक झाला होता. तर रस्त्यावर डिझेल सांडल्याने बराच भाग आगेने कवेत घेतला होता.

आणखी वाचा-यवतमाळात वादळी तांडव, वीज उपकेंद्रावर वीज पडल्याने बत्ती गुल

पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक अन्य मार्गाने वळविली. हा टँकर राळेगाव येथील एका पेट्रोलियम एजन्सीचा असल्याची माहिती आहे. टँकरमध्ये तिघेजण प्रवास करत होते. यातील एकाचा जळाल्याने जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर भाजले. जखमींना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diesel tanker overturned and caught fire at bhoir ghat near yavatmal nrp 78 mrj