आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने अचूक आहार, व्यायाम केल्यास मधुमेहासह अनेक असाध्य मानल्या जाणाऱ्या आजारांवर नियंत्रण शक्य आहे, असा दावा सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत फ्रीडम फ्रॉम डायबेटीस संस्थेच्या वतीने वेदप्रकाश जयस्वाल यांनी केला.
वेदप्रकाश जयस्वाल म्हणाले की, फ्रीडम फ्रॉम डायबेटीस संस्थेची स्थापना पुण्यातील डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी केली आहे. ते स्वत: अॅलोपॅथी तज्ज्ञ असून त्यांनी आहाराशी संबंधित अनेक संशोधन व अभ्यास केला आहे. या संशोधनाचा प्रयोग करून त्यांनी एक नवीन उपचारपद्धती विकसित केली आहे. त्यानुसार आहार व व्यायामातून त्यांनी हजारो रुग्णांना बरे केले आहे. सध्या या पद्धतीने ९०० हून अधिक रुग्ण मधुमेहापासून मुक्त झाले आहे, तर ५ हजाराहून जास्त रुग्णांच्या मधुमेहाच्या गोळ्याही बंद झाल्या आहे. अनेक रुग्ण रक्तदाब, थायरॉईड, कोलेस्टेरॉलची समस्या, स्थूलत्व अशा विकारांपासून बरे झाले आहे.सलग तीन महिने कालावधीच्या या उपचारपद्धतीचे फायद्यावर प्रकाश टाकताना जयस्वाल म्हणाले की, उपचाराकरिता आलेल्यांपैकी ६४ टक्के रुग्णांना इन्सुलीन घेण्याची गरज राहिली नाही. ५५ टक्के रुग्णांना औषधे बंद करावे लागले. ६ ते ११ टक्के रुग्णांना आपले वजन घटवणे शक्य झाले. रुग्णांमध्ये एचबीए- १ सीचे प्रमाण २.४ टक्क्यांनी सुधारले. त्याखेरीज रुग्णांचे लिपीड प्रोफाईल आणि उत्साहात लक्षणीय सुधारणा दिसून आली. या उपचार पद्धतीत प्रत्येक रुग्णाला आहार घेण्याबाबत एक विशिष्ट तक्ता दिला जातो. त्यानुसार पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहाराचे सेवन केल्यास संबंधित व्यक्तीला संतुलित कॅलरीज मिळत असून त्याचे वजनासह आजारांवर नियंत्रण मिळण्यास मदत मिळत असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला प्रमोद जयस्वाल, सचिन शिरवाडीकर यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांत रुग्णांची संख्या तिप्पट
भारतात सन १९६० नंतर नागरिकांच्या आहारासह जीवनशैलीमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल आल्याने विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली. गेल्या दहा वर्षांत या रुग्णांची संख्या तिप्पटीहून जास्तने वाढली. या रुग्णांवर आहारातून नियंत्रण शक्य असल्याचे मार्गदर्शन करण्याकरिता पुणे येथील डॉ. प्रमोद त्रिपाठी नागपूरला येणार असून ते ३ मार्च २०१६ रोजी आयएमएच्या उत्तर अंबाझरी सभागृहात सायंकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान मार्गदर्शन करणार आहे. अधिक माहितीकरिता डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. फ्रिडमफ्रॉमडायबेटीज. ओआरजी या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.