नागपूर : ओबीसींचे गेल्या नऊ दिवसांपासून संविधान चौकात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यावरून समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. माजी मंत्री सुनील केदार यांनी आंदोलन स्थगित होत असल्याचे जाहीर केले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारकडून लेखी आश्वासन मिळेस्तोवर आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका मांडली. जिल्हाधिकारी यांना ११ मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांनी आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाने रात्री निवेदन काढून महासंघाचे आंदोलन सुरू राहील.
सरकारने ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावावे आणि मराठा समजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार नाही, याचे लेखी आश्वासन द्यावे. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात येईल, असे म्हटले आहे. सर्व शाखीय कुणबी समाजाने आंदोलन तात्पुर्ते स्थगित केले असून राष्ट्रीय ओबीसी महासंघ मात्र आंदोलन सुरूच ठेवणार आहे. या घडामोडीवरून कुणबी-ओबीसी यांच्या आंदोलन स्थगितीवरून मतभेद असल्याचे दिसून येते.