१६ ते २० व्या शतकापर्यंतचा समावेश, संस्कृत भाषेतील सर्वाधिक हस्तलिखिते

ज्योती तिरपुडे, नागपूर</strong>

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे दुर्मिळ अशा १४ हजार हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी त्यांना डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील हस्तलिखिते १६व्या शतकापासून ते २०व्या शतकापर्यंतची असल्याची माहिती ग्रंथालयातून देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यातील ९० टक्के हस्तलिखिते संस्कृत भाषेत आहेत. १६वे शतक हे संस्कृत जाणणाऱ्यांच्या उत्कर्षांचा काळ होता.

शंकराचार्य, वल्लभाचार्य, निंबारकाचार्य, द्वयी तत्त्वज्ञानाचे मध्वाचार्य, चैतन्यप्रभू यांचा हा काळ होता. त्यांच्या आधीच्या संस्कृतीचे तंतोतंत जतन व्हावे, लोकांना त्या तत्त्वज्ञानाचा विसर पडू नये म्हणून त्या काळातील उपरोक्त विद्वानांनी ही हस्तलिखिते संस्कृत भाषेत रचून ठेवली. अशी जवळपास १४ हजार हस्तलिखिते आहेत. केवळ १० टक्के हस्तलिखिते हिंदी आणि मराठीत आहेत. प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासकांना अशा हस्तलिखितांची संशोधनासाठी मदत होते. यातील काही विद्यापीठाकडे होती तर काही हस्तलिखिते लोकांनी नष्ट करण्यापेक्षा विद्यापीठाकडे सोपवली. त्यामुळे हस्तलिखितांची संख्या वाढत गेली. यापैकी काही हात लावला की फाटतील, अशा अवस्थेत असल्याने लाल कापडांमध्ये ती बांधून ठेवण्यात आली आहेत. डॉ. वि.भि. कोलते ग्रंथालय आणि विद्यापीठ परिसरातील पी.व्ही. नरसिंव्हाराव ग्रंथालयात या हस्तलिखित विभागाचे प्रमुख  सहाय्यक ग्रंथपाल सुरेश रंधई आहेत. इतिहास, संस्कृत, वैद्यक शास्त्राशी संबंधित प्राध्यापक, संशोधक या हस्तलिखितांचा अभ्यास करण्यासाठी येतात.

आचार्यानी संस्कृती जोपासण्यासाठी, वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी हस्तलिखिते जतन केली. सोळाव्या शतकात शंकराचार्यापासून ते चैतन्यप्रभूंपर्यंत अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले.त्यावेळी संस्कृत जाणणारा वर्ग प्रभावित होऊन त्यांनी ही हस्तलिखिते रचली. गीता, ब्रह्मसूत्र यांच्यावरील भाष्य १६व्या शतकात मोठय़ा प्रमाणात लिहिली गेली.

– डॉ. रूपा कुलकर्णी, माजी विभाग प्रमुख, पदव्युत्तर संस्कृत विभाग, विद्यापीठ

हस्तलिखिते म्हणजे मूळ ग्रंथ नव्हे. मूळ ग्रंथ आणि हस्तलिखितांमध्ये किंचित फरक असू शकतो. हस्तलिखिते अगदीच हात लावला की फाटतील अशा अवस्थेत आहेत. जुनी हस्तलिखिते मौल्यवान असून त्यांच्या डिजिटलायझेशेनचा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या पिढीला त्यामुळे संशोधन  करता येईल.

– डॉ. सिद्धार्थ काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Story img Loader