राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता
नागपूर : परप्रांतीयांची मते निर्णायक असलेला पूर्व नागपूर मतदारसंघ मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी राहिला. त्यामुळे आता भाजपचा भर मताधिक्क्यासाठी याच मतदारसंघावर असून काँग्रेसने येथे मध्यमवर्गीय ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील इतर पाच मतदारसंघाप्रमाणे या मतदारसंघातही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे.
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात साडेतीन लाखांहून अधिक मते आहेत. येथे सर्वाधिक परप्रांतीय मतदार आहेत. याशिवाय येथे व्यापारी समुदाय मोठ्या संख्येने आहे. ओबीसी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. अनुसूचित जातीचे लोक १८ टक्क्यांहून अधिक आहेत. अनसुचित जमातीचे मतदार ९ टक्क्यांहून अधिक तर मुस्लीम मतदारांची संख्या देखील ९ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या काही निवडणुकांपासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.
आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : गडचिरोली – चिमूर; भाजपला ‘हॅटट्रिक’चा विश्वास तर काँग्रेसला विरोधी लाटेचा आधार!
२०१९ च्या लोकसभेत काँग्रेसला ६०,०७१ (२९ टक्के) आणि भाजपला १,३५,४५१ (६५.५ टक्के) मिळाली होती. येथे बसपा ३,९८१ (१.९ टक्के) तर वंचित बहुजन आघाडीने ३,५९४ मते (१.७१ टक्के) घेतली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७९,९७५ मते (४०.३ टक्के) आणि भाजपला १,०३९९२ मते (५२.४१ टक्के ) मिळाली होती. बसपाने ५,२८४ मते घेतली.
काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत विधानसभेत थोडी वाढ झाली होती. मात्र, ती अत्यल्पच होती. ही काँग्रेससाठी आता चिंतेची बाब ठरली आहे. शिवाय या मतदारसंघात काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना लक्ष घालण्याची सूचना केली होती. वंजारी हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजप आमदार कृष्णा खोपडे हे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवून आहेत. यातील प्रत्येक कार्यक्रमाला गडकरी यांनी हजेरी लावली. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसची कसोटी पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. परंतु काँग्रेसने ओबीसींचे प्रश्न हिरिरीने उपस्थित करून मतदारांना खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस या मतदारसंघात ओबीसी, मध्यवर्गीयांसोबत जीएसटीमुळे त्रस्त व्यापाऱ्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
आणखी वाचा-तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक
मतांच्या टक्केवारीत किंचित बदल
पूर्व नागपुरात २०१९ च्या लोकसभेपेक्षा विधानसभेत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत थोडी वाढ झाली. लोकसभेत केवळ २९ टक्के मते मिळाली होती. पण, सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभेत ४०.३ टक्के मते मिळाली.
२०१९ मध्ये काँग्रेसला ६०,०७१ मते आणि भाजपला १,३५,४५१ मिळाली होती. बसपा ३,९८१ आणि ३,५९४ वंचित बहुजन आघाडी मते मिळाली होती. २०१९ च्या विधानसभेत काँग्रेसला ७९,९७५ मते आणि भाजपला १,०३९९२ मते मिळाली होती. बसपाला ५,२८४ मते मिळाली होती.