नागपूर : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ताण पोलीस अधिकाऱ्यांवर वाढला होता. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४९६ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. तसेच राज्यातील ४२ सहायक पोलीस निरीक्षकांनाही पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. ‘लोकसत्ता’ने पदोन्नतीबाबत वृत्तमालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला होता, हे विशेष.
राज्य पोलीस दलात उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध पोलीस अधिकाऱ्यांवर कायदा व सुरक्षेबाबत ताण येत होता. तसेच एकाच अधिकाऱ्यांकडे किमान ५ ते १० गुन्ह्यांचा तपास देण्यात येत असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या करणे अनिवार्य होते. मात्र, गृहमंत्रालय आणि महासंचालक कार्यालयात समन्वयाचा अभाव असल्यामुळे पदोन्नत्या रखडल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली. त्याची पोलीस महासंचालक कार्यालयाने दखल घेऊन सोमवारी २०१३ अर्हता परीक्षा उत्तीर्ण ४९६ हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. तसेच ४२ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. बहुप्रतीक्षित पदोन्नतीची यादी जाहिर झाल्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य
गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती. त्यामुळे अधिकारी पदाची लागणारी वर्दी, कॅप, शूज व इतर तर साहित्य घेऊन ठेवले होते. परंतु, पदोन्नतीस विलंब होत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. आता महासंचालक कार्यालयाने सकारात्मकता दाखवून पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया आयुक्तालयातील एका पोलीस हवालदाराने दिली.
पोलीस निरीक्षक अद्यापही प्रतीक्षेत
राज्य पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपधीक्षक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील अनेक पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत असतानाही पदोन्नतीसाठी वाट बघत आहेत. राज्यात सहायक पोलीस आयुक्त पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. मात्र, पदोन्नत्या रखडल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.