नागपूर: मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दाम्पत्याच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा स्थितीत कारागृह प्रशासनाच्या पुढाकाराने वजह फाऊंडेशन आणि प्रयास टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यात आले. या शैक्षणिक मदतीमुळे कैद्यांच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनातील अडथळा दूर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारागृहात एका गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात पती-पत्नी दोघेही शिक्षा भोगत आहेत. त्यांना दोन मुली असून आजी ही सांभाळ करीत होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ती आजीसुद्धा मरण पावली. त्यामुळे दोन्ही मुलींच्या शिक्षणात खंड पडणार होता. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला होता. कारागृह अधीक्षक वैभव आगे आणि उपाधीक्षक दीपा आगे यांनी बंद्यांच्या पाल्यांसाठी कल्याणकारी योजना तयार केल्या आहेत.

हेही वाचा… राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता, विदर्भात आज मुसळधार

प्रयास टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव वाळके यांनी पुढाकार घेतला. वजह फाऊंडेशनचे संचालक डॉ. वाळके यांनी कैदी पती-पत्नीच्या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. दोन्ही मुली नववी आणि दहावीत आहेत. त्यांना शहरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. दोन्ही मुलींना शालेय गणवेश, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवासाची व्यवस्था करून दिली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कैद्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग

कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ योग्य राहावे, यासाठी कारागृह प्रशासनाच्या वतीने व्यक्ती विकास केंद्र नागपूरच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ ते १० या वेळेत महिला बंद्यांसाठी योग, साधना, प्राणायाम आणि ध्यान करवून घेतल्या जाते. या कार्यक्रमाचे नियोजन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director of the wajah foundation dr valke took responsibility of the education of the prisoners daughters adk 83 dvr
Show comments