नागपूर : एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी शासनाने पथकरमाफी जाहीर केली आहे. १३ जून ते ३ जुलै दरम्यान भाविकांना स्थानिक आरटीओतून पास घेऊन हा लाभ मिळवता येणार आहे. परंतु, या पथकरमाफीचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण, खरे लाभार्थी कोण याची पडताळणी करणारी यंत्रणाच आरटीओकडे नाही.
हेही वाचा – Video : वाघाने केली गायीची शिकार; व्हिडीओ सार्वत्रिक
आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूरला जातात. या भाविकांसाठी शासनाने १३ जून ते ३ जुलै दरम्यान १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्गावरील पथकर माफ केले आहे. या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी भाविकांना स्थानिक आरटीओ कार्यालयात अर्ज करून वाहन पास मिळवायचा आहे. परंतु, असा पास वाटताना या सुविधेचे खरे लाभार्थी कोण, हे तपासणारी यंत्रणा आरटीओकडे नाही. त्यामुळे अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला त्यांना वाहन पास द्यावीच लागणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या नावावर इतरही लोक या काळात या मार्गावर पथकरमाफी मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूर आरटीओतील अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, अर्ज करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.