लोकसत्ता टीम

अमरावती : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निवडण्यात आलेली प्रस्तावित जागा शहरापासून १० किलोमीटर दूर असल्याने जिल्ह्यातील रुग्णांसाठी ती गैरसोयीची ठरणार आहे, त्यामुळे महाविद्यालयाची जागा बदलविण्यात यावी, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी आज विधानसभेत केली. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या जागेवरून आमदार सुलभा खोडके आणि रवी राणा यांच्यातील मतभेद पुन्हा उघड झाले आहे.

जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करणे व गरजूंपर्यंत आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणे हा अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र अमरावती शहरापासून दूर जागेचा प्रस्ताव असल्याने त्याचा लाभ सामान्य गरजू रुग्णांना मिळणार नाही. धारणी, मेळघाटसारख्या दुर्गम भागातील रुग्णांनासुद्धा ते गैरसोयीचे ठरेल. तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा ते अडचणीचे ठरणार आहे. म्हणून शहराच्या मध्यभागी, सर्वांना सहजरीत्या पोहचता यावे, अशा ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी सुलभा खोडके यांनी केली आहे.

आणखी वाचा-नागपूर शहरातील अवैध बांधकामांना अधिकारी का संरक्षण देत आहेत? उच्च न्यायालयाचे ताशेरे, ‘परवानगीच का देता…’

आलियाबाद (वडद) येथील ई-वर्ग जमिनीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारली जाणार असून पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर जवळ आलियाबाद येथे जागा आरक्षित करण्यात आली. सुसज्ज इमारत, विद्यार्थी वसतिगृह, रुग्णालय, डॉक्टर, कर्मचारी निवासस्थाने आदी बाबींचा आराखडा तयार करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या अंदाज पत्रकानुसार एकूण १३०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे राणा यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-एसटी बस प्रवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकल्या जाणार? काय आहे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम जाणून घ्या…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शहराच्या मध्यभागी व जिल्ह्याच्या सर्व भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी सोयीचे असावे म्हणून अमरावती बायपास मार्गावरील कृषी विद्यापीठाच्या सुमारे ७५ हेक्टर जागेपैकी २५ एकर जागा शासकीय महाविद्यालयाकरिता घेण्यात यावी, असा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सुलभा खोडके यांनी दिली. सध्या शहरापासून दूर निवडलेली जागा रद्द करून पुन्हा बैठक घेऊन जागेसंदर्भात निर्णय घ्यावा, असा आक्रमक पवित्रा सुलभा खोडके यांनी घेतला. वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

महाविद्यालयासाठी समितीने निवडलेल्या जागे संदर्भात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. ती जागा समितीने नेमलेली असल्याने आता सदस्यांच्या तक्रारीमुळे आता ती पुन्हा तपासली जाईल, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

Story img Loader