नागपूर : कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पावरून भाजपामध्येच मतभेद असल्याचे चित्र आहे. एका गटाकडून प्रकल्प कोराडीत उभारण्याची मागणी केली जात आहे, तर दुसरा गट हा प्रकल्प पारशिवनीत हलवण्यासाठी आग्रही आहे. पर्यावरणवाद्यांना मात्र हा प्रकल्प नागपूरसह विदर्भात कुठेच नको आहे.
महानिर्मितीकडून नाशिक, परळी, चंद्रपूर, नागपूर येथील एकूण १,२५० मेगावॅटचे ६ संच बंद केले जाणार आहेत. त्याऐवजी कोराडीत ६६० मेगावॅटचे २ संच असा एकूण १,३२० मेगावॅटचा प्रकल्प प्रस्तावित आहे. नागपूर जिल्ह्यात नवीन वीज प्रकल्पाला विविध पर्यावरणवादी संघटनांचा विरोध आहे. पर्यावरणवाद्यांनी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाचा दाखला देत गडकरींनी हा प्रकल्प पारशिवनीत उभारण्याची मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. परंतु फडणवीस यांनी हा प्रकल्प सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असून प्रदूषणाचा प्रश्नच नसल्याचे सांगत तो प्रकल्प कोराडीतच उभारण्याचे संकेत दिले.
हेही वाचा – नागपूर : प्रेमाचा त्रिकोण; प्रियकराचा खून करण्याचा प्रयत्न
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही प्रकल्प कोराडीतच हवा, असा आग्रह आहे. परंतु भाजपाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कोराडीतील सुनावणीत याविरोधी भूमिका घेतली. हा प्रकल्प कोराडीत केल्यास नागपूरच्या स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला धक्का बसणार असल्याचे सांगत नागपूर व शेतकऱ्यांच्या वाट्याचे पेंचचे पाणी या प्रकल्पासाठी वळवले जाण्याचा धोकाही त्यांनी वर्तवला. हा प्रकल्प पारशिवनीत करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यामुळे भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे प्रकल्प कोराडीत उभारण्यासाठी आग्रही आहेत, तर गडकरी आणि रेड्डी हे पारशिवनीची मागणी करीत आहेत.
हेही वाचा – अमरावती : महिलेला अंघोळ करताना चोरून पाहिले, पुढे झाले असे की…
‘‘भाजपामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेसमध्येच मतभेद असून ते भाजपाबद्दल चुकीची माहिती पसरवतात. नवीन औष्णिक विद्युत प्रकल्पाबाबत स्थानिकांचे मत व विकासाचा दृष्टिकोन घेऊनच पक्षाकडून निर्णय घेतला जातो.” – चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप.