अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बडनेरा मतदारसंघातील कोंडेश्‍वर नजीकच्‍या अलियाबाद (वडद) येथील जागा निवडण्‍यात आली असली, तरी आमदार सुलभा खोडके यांनी या जागेला स्‍पष्‍टपणे विरोध दर्शविला आहे. विधिमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनादरम्‍यान वैद्यकीय शिक्षण विभागाच्‍या पुरवणी मागण्‍यांवर चर्चा करताना सुलभा खोडके यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या जमिनीचा मुद्दा उपस्थित करीत प्रस्‍तावित जागा ही शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असल्‍याने विद्यार्थी आणि रुग्‍णांसाठीदेखील ती गैरसोयीची असल्‍याचे म्‍हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करणे व गरजूंपर्यंत आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणे हा अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र अमरावती शहरापासून दूर जागेचा प्रस्ताव असल्याने त्याचा लाभ सामान्य गरजू रुग्णांना मिळणार नाही. तसेच धारणी, मेळघाटसारख्या दुर्गम भागातील रुग्णांनासुद्धा ते गैरसोयीचे ठरेल. तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा ते अडचणीचे ठरणार आहे. म्हणून शहराच्या मध्यभागी ज्या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. त्याच ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी सुलभा खोडके यांनी केली आहे.

हेही वाचा – गडचिरोली : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करा; काँग्रेसची मागणी

जागेबाबत आपण शासनाकडे प्रस्ताव दिला असून त्याचा विचार करूनच अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शहरात सर्व आरोग्य सुविधा व वैद्यकीय सेवा उपलब्ध असलेल्या भागात सुरु करण्यात यावे, असे सुलभा खोडके यांचे म्‍हणणे आहे.

अलियाबाद (वडद) येथील ई-वर्ग जमिनीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारली जाणार असल्‍याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. ही जमीन बडनेरा मतदारसंघातील असल्‍याने या जागेसाठी ते आग्रही असल्‍याचे सांगण्‍यात आले होते. महसूल, नगर रचना विभाग, महावितरण कंपनीसह ११ विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्‍त करण्‍यात आले असून अलियाबाद येथील ११ हेक्‍टर जमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्‍यास सरकारने मंजुरी दिल्‍याचे रवी राणा यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा – हृदयाचे ‘व्हॉल्व’ निकामी झालेल्या तरुणासाठी सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

आमदार सुलभा खोडके यांनी या जागेला विरोध केला आहे. त्‍यांनी थेट विधानसभेतच हा मुद्दा उपस्थित केल्‍याने या विषयाला पुन्‍हा तोंड फुटले आहे. अमरावतीत २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्‍याचे नियोजन आहे. नवीन इमारतीची उभारणी होईपर्यंत तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय आणि सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलच्‍या परिसरात हे महाविद्यालय सुरू करण्‍याच्‍या हालचाली आहेत. महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज सुरू केले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिलकडे प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला आहे. आता जागेवरून राजकीय मतभेद पुढे आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disagreement over place of amravati government medical college mla sulabha khodke raised the issue in the legislature mma 73 ssb
Show comments