वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक बुधवारी पार पडली. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे फर्मान सोडले. मात्र, त्यांच्यासमोरच राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य उफाळून आले. हे पाहता, जिल्ह्यातील तीनही विधानसभांवर राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातदेखील दोन गट उदयाला आले. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आपल्या समर्थकांसह अजित पवार गटात डेरेदाखल झाले. त्यांच्या रूपाने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : कार्यकारी अभियंत्याला उत्कृष्ट खड्डे सम्राट अभियंता पुरस्कार, मनसेचे अनोखे आंदोलन

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटात विभागली गेल्यानंतर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ युसुफ पुंजानी यांच्या गळ्यात पडली, तर चंद्रकांत ठाकरे यांना प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर बुधवारी अजित पवार गटाची आढावा बैठक शहरातील स्वागत लॉन येथे पार पडली. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत चंद्रकांत ठाकरे यांचे समर्थक अनुपस्थित राहिल्याने अजित पवार गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. परंतु एकही विधानसभा ताब्यात नसताना त्यातच जिल्हा राष्ट्रवादीत नाराजीनाट्य उफाळून आले असताना पक्षाची ताकद कितपत वाढणार? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या! केंद्राने उचलले पाऊल; काय आहेत शिफारशी? जाणून घ्या…

याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता, “नाराजांची समजूत काढू,” असे त्यांनी सांगितले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातील नाराजी दूर व्हावी, अशी भावना एकनिष्ठ कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discontent in ajit pawar group ahead of lok sabha elections pbk 85 ssb
Show comments