नागपूर : तमिळनाडूत तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी दुर्मिळ अशा तीन पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांच्या संबंधातील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.

या तिन्ही पाली ‘निमॉस्पीस’ प्रजातीच्या आहेत. यामध्ये ‘निमॉस्पीस अळगू’, ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ आणि ‘निमॉस्पीस मुंदाथुराईएनसीस’ या तीन पालींचा समावेश आहे. जगभरात पालींच्या १५० हून अधिक प्रजाती आढळून येतात. आत्तापर्यंत पश्चिम घाटात ‘निमॉस्पीस’ प्रजातीच्या तब्बल ४७  प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. शरीरशास्त्र आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या तिन्ही पाली वेगळय़ा असल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली आहे. त्यानंतर  २० जूनला ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ पत्रिकेतून हा शोध निबंध प्रकाशित करण्यात आला. यासंबंधातील माहिती तेजस ठाकरे यांनी समाजमाध्यमावरून काही छायाचित्रे प्रसारित करून दिली. नव्याने शोधण्यात आलेल्या या पालींमध्ये, ‘निमॉस्पीस अळगू’ हे नाव त्याच्या सौंदर्यावरून ठेवले आहे. अळगू हा तामिळ शब्द असून याचा अर्थ सुंदर असा आहे. ही पाल केवळ तिरुकुरुंगुडी राखीव जंगलात आढळते. ही समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते. त्याच बरोबर ‘निमॉस्पीस मुंदाथुराईएनसीस’ ही पालदेखील समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते. ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ ही समुद्र सपाटीपासून ९००-११०० मीटर उंचावरील सदाहरित जंगलात झाडांवर सापडते. या तिन्ही दिनचर पाली असून छोटय़ा किटकांवर आपला उदरनिर्वाह करतात.

शरीराचा रंग, खवल्यांची संख्या, तसेच इतर शारीरिक वैशिष्टय़े आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या तिन्ही प्रजाती नवीन असल्याचे सिद्ध झाले असून तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली आहे. या संशोधनामुळे पश्चिम घाटातील या प्रजातीची संख्या ४७ वर गेली आहे. मात्र, भारतात अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत असून पाली, इतर सरीसुप आणि एकूणच पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही.

-अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल, संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन.

Story img Loader