नागपूर : कर्करोग म्हणजेच कॅन्सर. या आजाराचे नाव जरी ऐकले तरी आपल्याला धडकी बसते. कर्करोग हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. भारतात दर लाख लोकवस्तीत १०० कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण आहे. कर्करोग झाल्याचे वेळेत माहिती न झाल्याने अनेक रुग्ण या आजाराने दगावतात. अनेकांना शेवटच्या टप्प्यात कर्करोग झाल्याचे माहिती होते. मात्र, आता नागपूरच्या विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान संस्था म्हणजेच व्हीएनआयटीच्या प्राध्यापकाने नवसंशोधन करून रुग्णाला कॅन्सर आहे की नाही? हे वेळेत शोधून काढणारे यंत्र विकसित केले आहे.
या यंत्राच्या माध्यमातून कॅन्सर असल्याचा शोध होऊन वेळीच उपचार मिळणार आहे. व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ. शोगत सिन्हा यांनी ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ या तंत्रज्ञानावर संशोधन सुरू केले. संशोधनासाठी ‘एसीआरबी’ आणि ‘स्पार्क’ यांच्याकडून निधी उपलब्ध झाला. त्यातून त्यांनी अनोखे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे अगदी अचूक निदान करता येणे शक्य होणार आहे. डॉ. शोगत सिन्हा यांनी विकसित केलेले हे ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ तंत्रज्ञान याचा वापर करताना तो शरीरातील ‘सॉफ्ट टिशूं’वर लेजर लाईटच्या माध्यमातून गरम केल्यास त्यातून निघणाऱ्या कंपणामुळे त्यात काय आहे याची इमेज तयार होते. त्यातून कॅन्सर आहे किंवा नाही हे अचूक कळण्यात मदत होते.
हेही वाचा – सनातन धर्मावर टीका : उद्धव, राहुल गप्प का? अनुराग ठाकूर यांचा सवाल
हेही वाचा – उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्यांची अडचण वाढणार; कारण काय? वाचा…
रुग्णांना डॉक्टरांनी सल्ला दिल्यावर तो जेव्हा कॅन्सरच्या तपासणीसाठी जातो तेव्हा त्याचे बरेचदा अचूक निदान होत नसते. त्यामुळे उशिरा माहिती झाल्यावर त्यावरील उपचाराचा फायदा होताना दिसत नाही. लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार आणि रुग्णाला योग्य उपचार मिळून मृत्यूचा धोका अधिक कमी होतो.