भंडारा : ग्रामीण असोत वा शहरी भागातील स्पर्धा परीक्षार्थी असो हे आपले सर्वस्व पणाला लावून वाटेल त्या परिस्थितीत परीक्षा देत असतात. मात्र गुणांकन करताना जेव्हा त्याला डावलण्याचा प्रकार घडतो आणि त्यामागचे कारणही कळत नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांनी काय करायचे ? असा सवाल आज येथील अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे आहे. स्पर्धा परीक्षेत अधिक गुण मिळवून यादीत नाव नसल्याने अन्याय झालेल्या भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील एका विद्यार्थ्याने निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे येथे थेट तक्रार दाखल केली आहे. रोशन नैताम असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
एस टी प्रवर्गात राखीव असलेल्या दोन जागेवर १२८ गुण प्राप्त तसेच १३० गुण प्राप्त विद्यार्थ्याचे गुणवंत यादीत नाव येते आणि त्याच एस टी प्रवर्गातील १३२ गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याची जर निवड होत नसेल तर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा का द्यायची असाही सवाल आज उपस्थित होतो आहे. अड्याळ येथील रोशन नैताम या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, २८ऑगस्ट २०२३ रोजी वाहन चालक आरोग्य विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात एकूण १७ पद होते ज्यात एस टी प्रवर्गासाठी दोन जागा होत्या. त्यातही एक सर्वसाधारण तर दूसरी जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यात एस टी प्रवर्गातील महिलांकरिता एकही अर्ज न आल्याने ती जागा आता सर्वसाधारण प्रवर्गात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती गुणवंत यादीमध्ये प्रकाशित करण्यात आली.
हेही वाचा…वर्धा : दोन दिवसात चार वासरांचा फडशा, गावकऱ्यांनी आणली वनखात्यास जाग…
त्यात ज्याला १३२ गुण आहेत त्याचे नाव नसुन दोन्ही जागेवर १२८ आणि १३० गुण प्राप्त विद्यार्थ्याचे नाव आले आहे. रोशन याने मुंबई तथा नागपुर येथे माहिती घेण्याकरिता गेला परंतू याविषयी काहीच माहिती हातात आली नसल्याने विद्यार्थ्याने तशी तक्रार संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे , आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई तसेच आरोग्य उपसंचालनालय यांचेकडे केली असून आरोग्य सेवा नागपुर येथे प्रसिद्ध झालेल्या वाहन चालकाच्या व्यवसायिक चाचणीच्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविला आहे.