गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या शिवणीमध्ये (मध्यप्रदेश) प्रचार दौरा असून, तेथे जाण्यासाठी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याविषयी मोठी गोपनीयता बाळगण्यात आली होती. पंतप्रधान मोदी प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्ताने बिरसी विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या करिता गोंदिया जिल्ह्यासह शेजारील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदि जिल्ह्यांतून पोलीस बळ, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक, अशी विविध पथकांसह अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. मागील चार दिवसांपासून हा परिसर ताब्यात घेण्यात आला होता. तीन दिवसांपासून पोलिसांच्या विविध पथकांची मॉकड्रिल सुरू होती.
हेही वाचा – बुलढाणा : ग्रामपंचायत निवडणूक; गुलाबी थंडीत मतदानही थंड! पहिल्या टप्पात ९ टक्केच मतदान
हेही वाचा – आता अमरावतीतील रस्त्यांवरही धावणार इलेक्ट्रिक बस, ५० बसेस मंजूर
पंतप्रधान मोदी यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटांच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात काय चर्चा झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.