चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या विजयाच्या आनंदाच्या चर्चेऐवजी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पराभवाची चर्चा मतदार, जनसामान्य तथा समाज माध्यमावर अधिक होताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी भाजप, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तीन पक्षाला निर्विवाद यश मिळाले. तर महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीन पक्षांचा दारुण पराभव झाला. महायुतीचा विजय व महाविकास आघाडीचा पराभव याला विविध करणे आहेत. याची समीक्षा होईलच. लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला झाला अशीही चर्चा आहे. मात्र ग्रामीण व शहरी भागात जमिनीवर ही स्थिती खरंच होती का. महायुतीत सहभागी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाला मतदारांचा इतका पाठिंबा होता का ? हा विषय आता चौका चौकात चर्चेचा विषय आहे.
हेही वाचा…प्रचंड बहुमतानंतरही भाजपमध्ये खदखद…नवनीत राणा, डॉ. बोंडेंच्या हकालपट्टीसाठी…
गाव पातळीवर, ग्रामीण भागात कट्ट्यावर, तसेच सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र आल्यानंतर चर्चेचा मुख्य विषय सर्वत्र हाच आहे. मतदारांमध्ये हा भाव आहे की खरंच महायुती सरकारने निर्विवाद बहुमत मिळविले आहे? समाज माध्यमावर तर अनेकांना महायुतीचा विजय व महाविकास आघाडीचा पराभव पचनी पडलेला नाही. बहुसंख्य कर्मचारी देखील खासगीत बोलतात की, महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या विरोधात होती. मग कर्मचाऱ्यांनी महायुती सरकारला मतदान केले असेल ? असे अनेक विषय आहे ज्यावर आता सर्वत्र चर्चा घडताना दिसत आहे. त्यामुळेच महायुतीच्या विजयाचा जल्लोष व आनंदापेक्षा महाआघाडीच्या पराभवाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
© The Indian Express (P) Ltd