अमरावती : खाली लाकडे पेटवलेली… वर गरम तवा… आणि त्यावर बसलेला एक बाबा. भक्तांना शिव्या हासडत असलेल्या या बाबांची एक चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच प्रसारित झाली असून, हा बाबा अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
गरम तव्यावर बसलेल्या या बाबाचे नाव संत गुरूदास महाराज असे असून मार्डी येथे या बाबाचा एक आश्रम आहे. समाज माध्यमांवर प्रसारित चित्रफित ही महाशिवरात्रीच्या कार्यक्रमातील आहे. आपण अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करीत नाही, आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते, त्यावेळी आपल्याला भान राहत नाही. हा श्रद्धेचा भाग आहे. आपण साधू, संत नाही, असे या बाबाचे म्हणणे आहे.
हेही वाचा – भर उन्हाळ्यात संततधार!, चंद्रपूर जिल्ह्याला झोडपले
हेही वाचा – भंडारा : टिप्परची दुचाकीला धडक, आजोबा-नात जागीच ठार
या चित्रफितीत हे बाबा एका गरम तव्यावर बसलेले आहेत. खाली चूल पेटलेली आहे. बाबांच्या हाती विडी आहे. विडी ओढत असलेले बाबा पाया पडायला आलेल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत आणि शिव्यांची लाखोलीदेखील वाहत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या चित्रफितीत बाबा चुलीसमोर लाकडावर बसले आहेत. त्या ठिकाणी भोजन तयार करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.