अमरावती : दिवाळीसाठी तयार फराळाची बाजारपेठदेखील सजली आहे. किराणा बाजारात फराळाचे जिन्नस करण्यासाठी लागणाऱ्या भाजणीसह अनेक पदार्थांची तयार पीठदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. अमरावतीकरांसाठी शहरातील रघुवीर मिठाईच्या संचालकांनी खास सोनेरी वर्ख असणारी ‘गोल्डन फ्लॉवर’ ही मिठाई बाजारात आणली आहे. ११ हजार रुपये किलो असा या खास मिठाईचा दर आहे.
‘गोल्डन फ्लॉवर’ या खास मिठाईमध्ये मामरा बदाम काजू, पिस्ता, शुद्ध केशर वापरण्यात आले आहे. खास राजस्थानमधील कुशल कारागिरांनी बनवलेली ही मिठाई शुद्ध २४ कॅरेट सोनेरी वर्खाने सजवण्यात आली आहे. दुसरीकडे, बाजारात वर्दळ वाढली असली, तरी तेल, तूप, डाळी, साखर आणि स्वयंपाकघरातील अन्य कच्च्या पदार्थांचे दर गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे साहजिकच दिवाळीमध्ये आवडीने खाल्ला जाणारा फराळ महागला आहे.
हेही वाचा – अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
करंजीचे तयार सारण, चिवड्यांसाठी खोबऱ्याचे काप तसेच चकलीसाठी भाजणी, लाडू, शंकरपाळी, अनारसे यांचे तयार पीठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. वेळ आणि कष्टही वाचवणाऱ्या या वस्तू खरेदीला पसंती मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी रेडिमेड फराळाचे स्टॉल सध्या लागले असून घरगुती चवीच्या तेल आणि तुपातील फराळासह डाएटच्या फराळालाही मागणी आहे. बचत गटांच्या महिलांना रोजगार मिळण्यासोबत मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. बचत गटाच्या फराळासाठी नोंदणी करण्यात आली आहे.
हेही वाचा – अकोला : ज्वारी, बाजरी व मक्याची हमीभावाने खरेदी होणार
लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळी, चकली या पारंपरिक फराळासह पालक शेव, बुंदी लाडू, टोमॅटो, शेजवान चकली, तिखट करंजी, बालुशाही, डाएट चिवडा आदी नव्या पदार्थांच्या प्रकारांची मागणीही ग्राहकवर्गातून केली जात आहे.